शनिवारी मध्यरात्री 12 पासून जिल्ह्यात 8 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन; ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री, खासदार, आमदारांच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता शनिवारी मध्यरात्रीपासून 8 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय आज सकाळी 10 वा. झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरूण लाड, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील हे दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता पाहता आज सकाळी 10 वा. दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
का हवे कडकडीत लॉकडाऊन
अ.क्र. पहिली लाट (maximum peak WK) दुसरी लाट (current WK)
1 कालावधी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2020 3 मे ते 11 मे 2021
2 दैनंदिन रूग्णांची सरासरी संख्या 794 1175
3 दैनंदिन सरासरी क्रिटीकल रूग्णसंख्या 320 369
4 दैनंदिन रेमडेसिव्हीर वापर 1 हजार कुपी 250 कुपी
5 दैनंदिन ऑक्सिजनचा वापर 28 मे. टन 52 मे. टन
6 दैनंदिन मृत्यूची संख्या (सरासरी) 26 50
7 एकूण ऑक्सिजन बेड 2396 2979
8 एकूण आयसीयू बेड 350 623
9 एकूण व्हेंटिलेटर बेड 140 289
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी तसेच वरिष्ठ सचिवांशी पालकमंत्री आणि मी रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत भेटलो आहे. जिल्ह्यासाठी रेमडेसिव्हीरचा कोटा दुप्पट करत असल्याचे आणि 10 मे. टन प्राणवायू पुरवठा केला जाईल, असे सांगितले. बाधितांची संख्या कमी करण्यासाठी साखळी तोडावी लागेल आणि त्यासाठी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिल्ह्यात आठ ते दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, ब्रेक द चेन करण्यासाठी जिल्ह्यात आता कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. वाढणारी रूग्णसंख्या, रेमडेसिव्हीर इंजेक्शन व ऑक्सिजनची उपलब्धता पाहता लॉकडाऊन करून कोरोना साखळी तोडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार श्री. आवाडे म्हणाले, लसीकरण केंद्र वाढवल्यास गर्दी होणार नाही. आयजीएममध्ये सुविधा वाढविण्याबाबत बैठक घ्यावी.
आमदार श्री. लाड म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात लस मिळावी. त्याचबरोबर पुढच्या लाटेचे नियोजन आतापासून करायला हवे. त्यासाठी रूग्णालयांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी प्राणवायुचे प्रकल्प उभे करावेत.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मुंबई पॅटर्न यशस्वी का झाला, पुण्यामध्ये चांगले यश मिळाले त्याचे अनुकरण जिल्ह्यामध्ये करायला हवे. लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करून त्यानंतरचा कृती आराखडा तयार हवा.
आमदार राजेश पाटील म्हणाले, लॉकडाऊन करणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन-तीन दिवसांची मुदत द्यावी. दुर्गम भागात आजरा- चंदगडमधील नियोजित प्राणवायू प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावेत.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण वाढवावे. सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा.
आमदार श्री. आसगावकर म्हणाले, प्रत्येक गावागावात वेगवेगळं लॉकडाऊन सुरू आहे. त्याबाबत एकत्रित लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेवू. हे लॉकडाऊन का करतोय याबाबतची माहिती नागरिकांना सांगायला हवी.
आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, जिल्ह्याला 10 मे. टन प्राणवायुचा कोटा वाढवून मिळणार आहे. लोकांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
आमदार श्री. जाधव म्हणाले, एचआरसीटी 15 च्या पुढे असणाऱ्या रूग्णांची नावे शासनाला कळवून रेमडेसिव्हीरची मागणी करावी. पोलीसांनी लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी. कोरोनाच्याबाबतीत राहणीमानात बदल करायला हवा.
विजय देवणे म्हणाले, प्रशासनाने सामाजिक संस्थांचाही सहभाग घ्यावा. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात व्हेंटिलेटरची संख्या 100 वरून 400 वर पोहचली आहे. त्याचबरोबर प्राणवायूचा पुरवठाही वाढवतोय. उद्योजकांशी चर्चा करून आमदार श्री. जाधव यांनी निर्णय कळवावा. तिसऱ्या लाटेची तयारीही करत आहोत. शेवटच्या क्षणाला रूग्ण उपचारासाठी येत असल्याने मृत्यूदर वाढत आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून मृत्यूदराबाबत कारण शोधून मार्गदर्शन केले जाईल. आरटीपीसीआर चाचणीची क्षमताही वाढवतोय. जिल्ह्यातील नवीन ऑक्सिजन प्रकल्प 50 दिवसात पूर्ण होतील. रविवारपासून लॉकडाऊनचा निर्णय घेवू. 8 ते 10 दिवसांचा लॉकडाऊन ठेवू. भाजीपाल्याबाबत नियोजन करावे. पोलीसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
बेडच्या माहितीसाठी http://kolhapurcovid.com/ डॅशबोर्ड
जिल्ह्यातील रूग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडच्या माहितीसाठी नागरिकांनी http://kolhapurcovid.com/ डॅशबोर्डवर तसेच 9356716563 /9356732728/ 9356713330 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर संपर्क करावा. तसेच सर्व फ्रंटलाईन वर्कर्सनी याबाबत नागरिकांना माहिती द्यावी, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी आवाहन केले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सविस्तर माहिती दिली. कडक लॉकडाऊन केल्यास कोरोनाची साखळी तुटण्यास 100 टक्के मदत होणार आहे. लॉकडाऊनमुळे रूग्णसंख्या नियंत्रीत राहील. त्यामुळे सुविधा पुरविण्यास ताण येणार नाही. ग्रामसमिती, वॉर्डसमिती पुन्हा सक्रिय केल्या आहेत. त्याचाही पुन्हा प्रभाव पहायला मिळेल. बेड व्यवस्थापनाच्या माहितीसाठी डॅशबोर्ड तसेच वॉररूम सक्रिय आहे. 400 जम्बो सिलेंडरचा पीएसए प्लॅंट बसवून आयजीएम आणि सीपीआर स्वयंपूर्ण करत आहोत. जिल्ह्यातील अतिरिक्त 1700 ते 1800 जम्बो सिलेंडरची क्षमता नवीन ऑक्सिजन निर्मितीने पोहचणार आहे. हे ऑक्सिजन प्लँट जनरेटर कॉम्प्रेसरवर चालणार आहेत.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा पोहचू नये याची दक्षता घेण्यासाठी शहरातील बालरोग तज्ज्ञ संघटनेशी चर्चा करण्यात आली आहे त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, ग्रामीण भागासाठी वॉररूम स्थापन करून तालुक्यांसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.