कागल तालुक्यातील बाळेघोल च्या माजी सरपंचाचा ३६ बोद तंबाकु जाळला ; सुमारे चार लाखाचे नुकसान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पूर्ववैमनस्यातून कागल तालुक्यातील बाळेघोल येथील माजी सरपंच मोहन दुडूप्पा शेटके यांचा सुमारे ३६ बोद तंबाकु अज्ञाताने जाळला आहे.यामध्ये शेटके यांचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे.अनेक वेळा त्यांच्या पाइपलाइन फोडणे,मोटारी विहिरीत ढकलून देणे अशा घटना घडल्या आहेत.पण शेतातील विक्री साठी तयार करून ठेवलेला तंबाकु अज्ञाताने पेटवला असल्याने परिसरात कमालीचा संताप व्यक्त होत आहे.पोलिसांनी आरोपीचा तात्काळ शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
शेटके यांनी आपल्या शेतातील तंबाकु काडून तो वाळवून ठेवला होता.तो घरी आणण्याच्या दिवशी पावसाचे वातावरण तयार झाल्याने त्यांनी कापशी रस्त्यावर असणारा त्यांच्या मित्र उदय मनोहर पोवार यांच्या शेतातील घरी तंबाकु चे ३६ बोद ठेवले होते.रात्री पोवार यांच्या शेतातील घराला कुलूप लावून ते आपल्या घरी गेले.शनिवारी रात्री आठ च्या सुमारास अज्ञाताने त्या घराची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून सर्वच्या सर्व बोदावर डिझेल किंवा पेट्रोल टाकून त्यांना आग लावली.आणि त्यानंतर तेथून पलायन केले.
दरम्यान याच वेळी सचिन शेटके व विकास पोवार हे कापशी कडे जाताना त्यांना ही आग लागल्याचे दिसले त्यांनी तात्काळ गावातील अन्य लोकांशी संपर्क केला आणि लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला.पण तंबाकु पेटल्याने त्याचा उग्र दर्प सगळीकडे सुटला होता त्यामुळे आग विझवण्यास अडचणी येत होत्या.त्यातून ही काही बोद मधील तंबाकु बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याला ही पेट्रोल डिझेल चा वास येत असल्याने सुमारे दोन ते अडीच टन तंबाकु पूर्ण खराब झाला आहे.
मोहन शेटके यांच्या बाबतीत वारंवार अशा घटना घडत असून त्यांनी अनेक वेळा मुरगूड पोलिसात फिर्याद दिली आहे.पण हे कृत्य करणारा अज्ञात इसम मात्र सापडला नाही त्यामुळे निर्ढावलेल्या त्या इसमाने यावेळी तंबाकु पेटवून दिला आहे.काही दिवसांपूर्वी शेटके यांच्या शेतातील सर्वच पाइपलाइन कऱ्हाडी ने अनेक ठिकाणी फोडली होती.तर त्यानंतर त्यांची वीज मोटार विहिरीत ढकलून दिली होती.याही वेळी त्यांनी पोलिसात धाव घेतली होती.पण पोलिसांनी रात्रीच्या वेळी तुम्हीच पहारा ठेवून कोण करते त्याचा पुरावा तयार करा असा सल्ला त्यांना दिला होता.शेटके यांनी या आगीच्या घटनेची पोलिसात फिर्याद दिली आहे.