ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका..!

टीम ऑनलाईन :

नवाब मलिक यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत मलिकांनी कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना हा एक मोठा झटका बसला आहे.

काय म्हटलं कोर्टाने ?

ईडीने आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हणत नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण आज (supreme court) सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.

आधी मुंबई हायकोर्टानेही फेटाळली याचिका….

गेल्या महिन्यात 15 मार्च रोजी मुंबई हायकोर्टाने सुद्धा नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली होती.

नवाब मलिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात काही तथ्य नाही मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. मात्र, ही याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा याचिका फेटाळून लावल्याने नवाब मलिक यांना एक मोठा झटका बसला आहे.

गेल्या आठवड्यात नवाब मलिकांची संपत्ती जप्त…

नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने 13 एप्रिल रोजी मोठी कारवाई केली. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली. यामध्ये मुंबईतील महत्त्वाची संपत्ती आणि उस्मानाबादेतील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने संबंधित कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ईडीने नवाब मलिकांचे मुंबईतील पाच फ्लॅटवर जप्ती आणली आहे. यातील तीन फ्लॅट हे कुर्ला तर दोन फ्लॅट हे वांद्रे परिसरातील आहेत. ईडीने नवाब मलिक यांची उस्मानाबाद येथील 148 एकर शेतजमीनही ताब्यात घेतली आहे. ईडीने मलिकांच्या एकूण 9 मालमत्तांवर टाच मारली आहे. ईडीची अद्यापही चौकशी सुरु आहे. पण ईडीने मलिकांच्या संपत्तीवर आणलेली जप्ती ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि एनआयएकडून सुरु आहे. तसेच नवाब मलिकही सध्या अटकेत आहेत

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks