धन्यवाद उद्धवजी, पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात ! नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधवांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. या निवडणुकीसाठी जाधव यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही जयश्री जाधव यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यात्पूर्वी जाधव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यानंतर आपल्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी त्या मातोश्रीमध्ये गेल्या.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीदरम्यान जयश्री जाधव यांच्यासोबत गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.