सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार : राजे समरजितसिंह घाटगे ; राजे फाउंडेशन संचलित सिद्धिविनायक नर्सिंग होम, हॉस्पिटलचे उद्घाटन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राजे फाउंडेशन संचलित सिद्धिविनायक नर्सिंग होम या हॉस्पिटल च्या माध्यमातून नागरिकांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कागल येथे बापूसाहेब महाराज चौकातील दूधगंगा डेअरीच्या जागेतील राजे फाउंडेशन संकलित सिद्धिविनायक नर्सिंग होम नावाने सुरू केलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन व हेल्थ कार्डचे अनावरण झाले.
श्री घाटगे पुढे म्हणाले, या संयुक्त आरोग्य उपक्रमांतर्गत शाहू परिवारातील घटकांना हेल्थ कार्डच्या माध्यमातून सवलत मिळेल. इतरांनीही ती टप्प्याटप्प्याने देण्यासाठी नियोजन करू.याआरोग्य सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
सिद्धिविनायक नर्सिंग होमचे डॉ. संजय देसाई म्हणाले, आजार झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी काळजी घ्या. मात्र आजार झाल्यास घाबरू नका.योग्य निदान व त्वरित उपचार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे म्हणाल्या,या संयुक्त आरोग्य उपक्रमाअंतर्गत नागरिकांना माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.
व्यासपीठावर शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शाहू कृषीचे अध्यक्ष अनंत फर्नांडिस, उपाध्यक्ष अरुण शिंत्रे,दूधगंगा डेअरीचे चेअरमन अजितसिंह घाटगे, व्हाईस चेअरमन प्रमोद कदम, के.डी.घाटगे, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर आदी उपस्थित होते.
स्वागत डॉ महेंद्र पाटील यांनी केले आभार सुभाष कांबळे यांनी मानले.