बोरवडेत आजपासून चैत्र उत्सवास प्रारंभ

बिद्री प्रतिनिधी : आकाश वारके
बोरवडे ( ता. कागल ) येथील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरात चैत्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे हे ४३ वे वर्ष असून, दि. ११ ते १८ एप्रिलपर्यंत पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन व रात्री हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. ११ रोजी सरपंच गणपतराव फराकटे व त्यांच्या पत्नी शोभाताई फराकटे यांच्या हस्ते कलशपूजन तर माजी पं. स. सदस्य रघुनाथ कुंभार , तानाजी साठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ध्वजारोहण होणार असून ज्ञानेश्वरी पुजन करुन सप्ताहाची सुरवात होणार आहे.या कालावधीत ह.भ.प. ज्ञानदेव शिंदे, ह.भ.प. नामदेव साळवी, ह.भ.प. दत्तात्रय साठे, ह.भ.प. प्रकाश फराकटे, ह.भ.प. तानाजी पाटील, ह.भ.प. नारायण एकल यांचे प्रवचन तर ह.भ.प. बबन बेलेकर, ह.भ.प. ज्ञानदेव शिंदे, ह.भ.प. बाळकृष्ण गिरी, ह.भ.प. महेश भादवणकर, ह.भ.प. तानाजी पाटील, ह.भ.प. नारायण एकल यांचे कीर्तन होणार आहे.
सोमवार दि. १८ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चैत्र उत्सव कमिटीने केले आहे .