राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मंडलिक संकुलच्या गौरी पाटीलला रौप्यपदक

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोटा (राजस्थान) येथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलची कुस्तीगीर कु. गौरी मधुकर पाटील हिने ५० किलो वजन गटात रौप्यपदक पटकाविले.
अंतिम सामन्यात गौरी विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदक विजेती वनीता (हरियाणा) यांच्यात लढत झाली. या तुल्यबळ लढतीत सुरुवातीलाच आक्रमण करत गौरीने ४ गुणांची कमाई केली. परंतु, नंतर वनीताने गौरीवरती ६ गुण मिळवत दोन गुणांची आघाडी ठेवत सुवर्णपदकाची मानकरी ठरली व गौरीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
कुस्ती कारकिर्दीतील हे कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील गौरीचे पहिलेच पदक असून, या रौप्यपदकामुळे भारतीय कुस्ती संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली आहे. यामुळे शिबिरामध्ये होणाऱ्या जागतिक आशियाई कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी खेळण्याची तिला संधी मिळेल.
गौरीला राष्ट्रीय प्रशिक्षक दादासो लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले, तर माजी खासदार संजय मंडलिक व वीरेंद्र मंडलिक यांचे प्रोत्साहन मिळाले.