ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर येथे 11 जून रोजी होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार ; कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्याची ने-आण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला किमान 60 बसेस देण्यात येणार

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे दिनांक 11 जून 2023 रोजी आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व शासकीय विभाग व अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम करुन जिल्ह्याला देण्यात आलेल्या 75 हजार लाभार्थी निवडीच्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अहोरात्र काम करावे व हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरेल यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. 

 जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. रेखावार मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, तहसीलदार स्वप्निल पवार यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री. रेखावर म्हणाले की, शासन आपल्या दारी हा उपक्रम पूर्णपणे शासकीय कार्यक्रम असून या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांची निवड करावी. कार्यक्रमासाठी लाभार्थी ने-आण करण्याची सर्व जबाबदारी त्या त्या विभागाची असून गगनबावडा तालुक्यासाठी 25 बसेस व इतर सर्व तालुक्यासाठी प्रत्येकी 60 बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रत्येक विभागाने पुढील सात दिवसात आपल्या अधिनस्त सर्व अधिकारी-कर्मचारी यांना प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन त्या कुटुंबातील व्यक्तींना कोणत्या शासकीय योजनेचा लाभ मिळू शकतो याची माहिती घ्यावी व लाभार्थ्यांची निवड अंतिम करावी. निवडलेल्या लाभार्थ्याला शासकीय योजनेचा 100 टक्के लाभ मिळालाच पाहिजे याबाबत संबंधित विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिले.

तालुकास्तरीय यंत्रणांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दक्ष राहून काम करावे. गटविकास अधिकारी यांनी दोन दिवसातून एकदा तर तहसीलदार यांनी रोजच्या रोज बैठका घेऊन लाभार्थ्यांची निवड मोठ्या प्रमाणावर होईल यासाठी प्रयत्न करावेत. निवडलेला लाभार्थी व त्याविषयीची माहिती तयार करुन विहित प्रपत्रात भरुन द्यावी. ही माहिती फक्त युनिकोड फॉन्टमध्येच भरुन 7 जून पर्यंत जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश श्री. रेखावार यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य विभाग, कौशल्य विकास, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, पुरवठा विभागासह अन्य विभागांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुखांनी याच आठवड्यात योजनांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करुन मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची निवड करावी, असे निर्देश दिले.

सहित्य वाटप – जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून तीस लाभार्थ्यांना मळणी यंत्र, स्प्रे पंप, शेंगा फोडणी यंत्र व डिझेल पंपचे किट वाटप करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडून विविध कृषी अवजारे वाटप करण्याचे नियोजित आहे. तसेच अन्य शासकीय विभागांना शासन आपल्या दारी उपक्रमात साहित्य वाटप करावयाचे असेल तर त्या विभागांनी त्वरित माहिती सादर करावी, असे निर्देश देण्यात आले.

दिव्यांग कर्मचाऱ्याला वाहन खरेदीसाठी एक लाखाचा निधी-  राज्य शासनाकडून शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्याला त्यांच्यासाठी बनवण्यात आलेले विशेष वाहन खरेदीसाठी योजना असून या अंतर्गत एक लाखाचा निधी देण्यात येतो. तरी याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने त्यांच्या कार्यालय प्रमुखाकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

अधिकारी कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नये– दिनांक 11 रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनांक 1 ते 12 जून या कालावधीत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी रजा घेऊ नये, असे आवाहन श्री. रेखावर यांनी केले.या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुका स्तरावरील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व अन्य विभागाचे तालुकाप्रमुख उपस्थित होते.  

जिल्ह्यातील 95 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन:-‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असले तरीदेखील 95 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचे जिल्हा प्रशासनाने  नियोजन केले आहे. सर्व संबंधित विभागाच्या वतीने त्यांच्या स्तरावरुन प्रत्येक गावात व प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन शासकीय योजनेच्या लाभास पात्र व्यक्तींचे सर्वेक्षण केलेले आहे. तालुका निहाय लाभार्थी निवडीचे दिलेले उद्दिष्ट पुढील प्रमाणे….करवीर 10 हजार, गगनबावडा 4 हजार,  शिरोळ 10 हजार, हातकणंगले 10 हजार, पन्हाळा 8 हजार, शाहूवाडी 8 हजार,  कागल 8 हजार, राधानगरी 8 हजार, आजरा 8 हजार, भुदरगड 7 हजार, चंदगड 7 हजार व गडहिंग्लज 7 हजार याप्रमाणे तालुकानिहाय लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे..

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks