नारायण राणे यांना जामीन मंजूर ; महाड सत्र न्यायालयाचा निर्णय

महाड :
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. आक्षेपार्ह विधानावरुन महाड पोलिस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात महाड येथील सत्र न्यायालयात राणे यांच्या गुन्ह्या संदर्भात रात्री उशिरा सुनावणी सुरु होती. अखेर या सुनावणी दरम्यान सत्र न्यायालायाने नारायण राणे यांचा जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे नारायण राणे आणि भाजप समर्थकांना दिलासा मिळाला आहे.
नारायण राणे यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
महाड सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री राणे यांना जामीन मंजूर केला आहे. हे निकालाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. महाड पोलिसांनी कोर्ट परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच न्यायालय परिसरात राणे समर्थक भाजपचे कार्यकर्ते तसेच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नारायण राणे यांचा जामीन मंजूर होताच त्यांच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात जल्लोष केला पण, राणे यांच्यासह त्यांच्या मुलांनी नितेश आणि निलेश राणे यांनीं न्यायालय परिसरात कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करु नये जल्लोष साजरा करु नये. न्यायालय परिसराचा मान राखावा अशी विनंती केल्यावर कार्यकर्ते शांत झाले.
न्यायालायात राणे यांच्या सुनावणी दरम्यान १ तासाहून अधिक युक्तीवाद चालला. सरकारी वकीलांनी नारायण राणे हे केंद्रीय मंत्री तसेच जबाबदार व्यक्ती असून त्यांनी असे बेजबाबदार वक्तव्य कसे काय केले असा प्रश्न उपस्थित केला. तसेच या पाठीमागे मोठे कट कारस्तान असू शकतं असे ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरच व त्यांच्या प्रतिष्ठेला आव्हान देणारे वक्तव्य केल्यामुळे तसेच घटनात्मक पदाचा अनादर व अवमान केल्या बद्दल राणे यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी विनंती वकीलांनी न्यायालयाकडे केली.
राणे यांच्या वकीलांनी युक्तीवाद करत सरकारी वकीलांचे सर्व दावे फेटाळले. राणे यांचे वक्तव्य हे राजकीय असल्याचे त्यांचे वकील म्हणाले. शिवाय नारायण राणे यांच्यावर अयोग्य प्रकारे अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर चुकीचे कलम लावून पोलिस कोठडीची मागणी करत असल्याचे वकील म्हणाले. राणे यांच्याकडून कोणतीही रिकव्हरी करायची नाही त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा असा दावा राणे यांच्या वकीलांनी न्यायालयाला केला.
राणे यांनी त्यांच्या रॅली दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले होते. राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक होत ठिकठिकाणी राणेंच्या विरोधात आंदोलन करत होते. दरम्यान राणे यांच्या विरोधात महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथून केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करुन महाड येथे आणण्यात आले.
या प्रकरणाची दखल घेत रात्री उशिरा महाड येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राणे यांना जामीन मंजूर केला.