नंदिनी साळोखेला कुस्तीत ‘सुवर्ण’

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भिवानी (हरियाणा) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिलांच्या कुस्ती स्पर्धेत नंदिनी बाजीराव साळोखे हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे ५० किलो वजन गटामध्ये प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेच्या इतिहासात महिला कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठास पहिले सुवर्णपदक नंदिनीच्या रूपाने मिळाले. पहिल्या कुस्तीत नंदिनीने अंतिमाकुमारी (बिहार) हिला कलाजंग डावावर चितपट केले. दुसऱ्या कुस्तीत कलमदीप कौर (पंजाब विद्यापीठ) हिला १० विरुद्ध शून्य गुणाधिक्याने पराभूत केले. तिसऱ्या कुस्तीत संगीता (आजमेर) हिच्यावर १२-२ गुणाधिक्याने मात केली. चौथी कुस्ती नंदिनी विरुद्ध रूपाली आडसुळे यांच्यात झाली. नंदिनीने रूपालीला भारंदाज डावावर चितपट केले. अंतिम लढत सिमरन (लवली विद्यापीठ पंजाब) हिच्यासोबत झाली. यात १३-२ गुण फरकाने एकतर्फी विजय मिळवत नंदिनी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. ५० किलो वजन गटात ९६ महिला सहभागी होत्या. नंदिनी ही देवचंद कॉलेज, अर्जुननगर निपाणी येथे एम.ए. भाग २ मध्ये शिकत आहे. प्रशिक्षक दादासो लवटे, सुखदेव येरूडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन, तर राष्ट्रीय तालीम संघ, खासदार संजय मंडलिक यांचे प्रोत्साहन लाभले.