भारतीय सैन्यदलातील जवानांची नावे ग्रामपंचायत फलकांवर लावावीत ; स्वराज्य निर्माण चे संस्थापक संदिप बोटे यांची नवी चळवळ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
देशाच्या सीमेवर अहोरात्र जागता पहारा देत भारतीय नागरिकांचे जीवन सुरक्षित ठेवणाऱ्या त्यासाठी प्रसंगी कठोर त्याग आणि बलिदान देणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवानांची नावे त्यांच्या गावातील ग्रामपंचायत फलकावर दिमाखाने झळकली पाहिजेत.यासाठी देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीने जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठीआपले योगदान द्यावे.स्वराज्य निर्माण संस्थेच्या वतीने ही प्रेरणादायी चळवळ ९ ऑगस्ट च्या क्रांती दिनापासून सुरु करत असल्याची घोषणा स्वराज्य निर्माण चे संस्थापक, महाराष्ट्र एन.जी.ओ.समितीचे राज्यसंपर्कप्रमुख संदिप बोटे यांनी केली .
या अभिनव चळवळीची घोषणा करताना संदीप बोटे म्हणाले,” आपल्या गावातील जवान देशसेवेमध्ये कार्यरत आहेत तर काही देशसेवा करुन आलेले आहेत. यामध्ये आर्मी, नेव्ही, सीआरपीएफ,आरपीएफ तसेच सैन्यदलातील जवान हे आपल्या गावचे राज्याचे देशाचे वैभव आहेत. ते आपल्या गावातील तरुण- तरुणींसाठी आदर्श आहेत. आशा जवानांचा सर्वानांच सार्थ अभिमान आहे. अशा जवानांचा गावच्या वतीने बहुमान म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात फलकावर त्यांची नावे लिहली जावीत. अशी मागणी क्रांती दिनाच्या दिवशी स्वराज्य निर्माण संस्थेच्या माध्यमातून करत आहोत. देशासाठी बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव म्हणून त्यांचा हा एकप्रकारे सन्मानच होईल.