बेळगाव पोलिस अधीक्षकांनी केला नूतन आयपीएस बिरदेव डोणे चा सत्कार

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे हा युवक मोठ्या जिद्दीने आयपीएस झाला. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला, त्यावेळी बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका खेडेगावातील माळरानावर मेंढरे चारत होता. दुर्दैवाने निकालादिवशीच बिरदेवचा फोन चोरीला गेला होता. पण, आई-वडील आणि भावाला त्याने फोन हरवला, असे न सांगता फोन बंद झाल्याचे सांगितले.
त्यानंतर बिरदेव फोन चोरीला गेल्याची फिर्याद जवळच्या पोलिस ठाण्यात देण्यासाठी गेला. पण, तेथील पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. दरम्यान, काही वेळातच परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये बिरदेव ५५१ रँकने उत्तीर्ण झाला. त्याची आयपीएस म्हणून निवड झाली.
गुरुवारी (ता. २३) एका न्यूज चॅनेलला मुलाखत देताना त्याने पोलिस ठाण्यातील हा किस्सा बोलता बोलता सांगून टाकला होता. त्याचवेळी त्याने लोक आपल्यापर्यंत येतात, त्यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, हे आपले कर्तव्य असल्याचेही बोलून दाखवले होते. बघता बघता ही मुलाखत सर्वत्र व्हायरल झाली आणि याची दखल थेट बेळगावच्या पोलिस अधीक्षकांनी घेतली.
बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बिरदेवला तो थांबलेल्या पालावर अभिनंदनासाठी भेटीचे निमंत्रण पाठवले. पोलिस अधीक्षक दालनात डॉ. गुळेद यांनी बिरदेवचा सत्कार केला. दरम्यान, बिरदेवचे अभिनंदन करण्यासाठी आज दिवसभर रीघ लागली होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉलद्वारे अभिनंदन करून बिरदेवला शुभेच्छा दिल्या.