मराठा समाजासाठी आरक्षण मर्यादा वाढवा : महाराष्ट्राचे सर्वपक्षीय खासदार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तमिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मर्यादा वाढवण्यासाठी पावले उचलावीत, या मागणीसाठी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेण्याचा निर्णय महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली.
दिल्लीत महाराष्ट्रातील खासदारांची बैठक गुरुवारी रात्री उशिरा झाली. या विषयी पाटील यांनी सांगितले की, मराठा, कुणबी, ओबीसी, धनगर बांधवांकडून मोर्चे काढले जात आहेत. सर्वच समाज बांधवांना न्याय मिळेल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. यासाठी सर्वांनी मदत करण्याचेही ठरवण्यात आले.
तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर निर्णय घेण्याचा आग्रह
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत तमिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढवणे, या मुद्यावर अधिक भर देण्यात आला. केंद्र सरकारच्या मदतीने ही मर्यादा वाढवणे, शक्य आहे असा सूर व्यक्त करण्यात आला. बैठकीला सर्वपक्षीय खासदारांची उपस्थिती होती. सर्वांनी मते मांडली असा दावा करण्यात आला. मात्र, हेमंत पाटील यांच्या वक्तव्यात उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या नावाचा कोणताही उल्लेख नव्हता.