मुरगुड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

मुरगूड प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक मुुुरगुड येथे विविध उपक्रमांनी अमाप उत्साहात साजरा झाला. यावेळी शहरातून काढलेल्या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी चार वाजता हेलिकॉप्टरमधून छत्रपतींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी मुरगूड शहर व पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
न.प.च्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा संयुक्त गावभाग यांतर्फे आयोजित केला होता. पूर्वसंध्येला पुतळ्यासमोर भवानी मातेची मूर्ती साकारून सिनेकलाकार श्रीधर गोंधळी यांचा ‘शिव जागर’ हा गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. सोमवारी सकाळी सात वाजता अंबाबाई मंदिरापासून पालखीसोहळा सुरू झाला.
त्यानंतर बारा बलुतेदारांच्या हस्ते शिवपुतळ्याला अभिषेक घातला,दुपारी हळदी-कुंकू समारंभ पार पडला. व शोभा यात्रेचा प्रारंभ झाला. त्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीने शिवपुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पवृष्टी केली. त्यानंतर अंबाबाई मंदिरापासून शोभयात्रेला प्रारंभ झाला.
डॉ. श्रीकृष्ण देशमुख, खासदार संजय मंडलिक, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, शाहूचे अध्यक्ष समरजित घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक नावेद मुश्रीफ, अंबरीश घाटगे यांच्या हस्ते या शोभा यात्रेचा प्रारंभ झाला या शोभायात्रेत शालेय मुलांनी सादर केलेला शिव देखावा, पुणे येथील महिला झांजपथक, लेझीम पथक, धनगरी ढोल, करंड्या, हलगी, कैचाळ, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, आदींनी लक्ष वेधले होते. शोभायात्रा अंबाबाई मंदिरापासून, हुतात्मा तुकाराम चौक, एस.टी. स्टॅण्डमार्गे नगरपरिषदेच्या समोरून, बाजारपेठेतून पुन्हा शिव पुतळ्याच्या समोर येऊन सांगता झाली.