मुरगूड पोलीस स्टेशनकडून गहाळ झालेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत ; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील चोरट्यांनी लांबवलेले व गहाळ झालेले अंदाजे २ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचे तब्बल १७ मोबाईल हँडसेट तपासांती मुरगूड पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले. ते मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
याबाबत वेळोवेळी मोबाईल धारकांनी मुरगूड पोलिसांत फिर्यादी व तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलीस यंत्रणेच्या सीईआयआर पोर्टल मार्फत तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम राबवून जास्तीत जास्त मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या सूचना व आदेशाप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी करे, पो.हे.कॉ. संदीप ढेकळे, पो. कॉ. सचिन साळुंखे, महिला कॉ. तेजस्वी चौगुले यांच्या पथकाने गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी गेल्या दोन महिन्यांमध्ये सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हे. कॉ. अमर अडसुळे यांची मदत घेऊन तांत्रिक तपास केला आणि महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्यातून हे मोबाईल हँडसेट संच शोधून मोबाईल संचाची व कागदपत्रांची ओळख पटवून ते मोबाईल मूळ मालकांकडे परत केले.