फाईट अगेन्स्ट थॕलेसेमिया अर्गनायझेशन च्या वतीने सीपीआर येथे सातारा जिल्ह्यातील थॅलेसेमिया, हिमोफेलिया रूग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालयाच्या वतीने यापूर्वी कोविड काळात जिल्ह्याची सिमा न पाहता रूग्णांवर उपचार करण्याचे खूप मोठे काम तर झालेच, शिवाय सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव अशा इतर जिल्ह्यात थॅलेसेमिया आजाराची औषधे उपलब्ध नसताना सीपीआर रूग्णालयाने बाहेर जिल्ह्यातील रूग्णांना सुद्धा औषध पुरवठा केला.
हे मदतीचे कार्य निरंतर सुरू ठेवत सीपीआर रूग्णालय येथे मार्च महिन्यापासून सातारा जिल्ह्यातील थॅलेसेमिया व हिमोफेलिया रूग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येत आहे. सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिमॕटोलॉजिस्ट डॉक्टर नसल्यामुळे तेथील रूग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळू शकत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया अॉर्गनायझेशन, महाराष्ट्र संस्थेने याबाबत अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत यांना निवेदन दिले असता, कोल्हापूरातील हिमॕटोलॉजिस्ट डॉक्टर वरूण बाफना हे याबाबतीत सहकार्य करतील असे सांगितले.
त्यानुसार प्रत्येक मंगळवारी सातारा जिल्ह्यातील कागदपत्रे पूर्ण असणारे काही थॅलेसेमिया व हिमोफेलिया आजाराचे रूग्ण कोल्हापूरात सीपीआर रूग्णालयात येतात, डॉक्टर बाफना या रूग्णांची कागदपत्रे व शारीरिक तपासणी करून त्यांना दिव्यांगत्वाची टक्केवारी लिहून देतात, त्यानंतर या रूग्णांना सातारा सिव्हिल येथे गेल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त होते.
काल मंगळवार दि. 19/ 4/ 2022 रोजी सुद्धा सातारा मधील रूग्ण तपासणीसाठी आले होते. प्रत्येक शिबीराप्रमाणे आजही आलेल्या रूग्ण व त्यांच्या पालकांसाठी फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया अॉर्गनायझेशन संस्थेच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, खजानिस अनिश पोतदार, डॉ. ऋषीकेश पोळ यांनी शिबिरावेळी उपस्थित राहून आलेल्या रूग्णांना सहकार्य केले.या पध्दतीने आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यातील 125 हून अधिक थॅलेसेमिया व हिमोफेलिया रूग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले आहे.