ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड : होसूर येथे सोमवारी मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर

चंदगड प्रतिनिधी: संदीप देवण

होसूर, ता चंदगड येथे सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सर्व रोगनिदान व उपचार शिबिर, दिव्यांग विकास कार्यक्रम (दिव्यांग पुनर्वसनासाठी मदत व मार्गदर्शन), आयुष्यमान भव योजनेंतर्गत गोल्डन कार्ड काढणे (५ लाख रुपये पर्यंत मोफत उपचार) व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुबराव रामचंद्र पवार व आत्याळ येथील माध्यमिक शिक्षक पुंडलिक रामचंद्र पवार यांनी आपल्या मातोश्री कै शांताबाई रामचंद्र पवार यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे. मराठी विद्या मंदीर होसूर येथे सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत होणाऱ्या शिबिराचे उद्घाटन कोल्हापूर जिप. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, भारत सरकारचे कृषी अर्थतज्ञ डॉ परशराम पाटील, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेश गायकवाड, जिप. मुख्य व वित्त अधिकारी अतूल आकुर्डे, गटविकास अधिकारी एस एल सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बी डी सोमजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ ए आय नायकवडी (प्रा आ केंद्र तुडीये), डॉ बी के कांबळे (प्रा आ केंद्र कोवाड), माजी जिप अध्यक्षा पुष्पमाला जाधव, सरपंच राजाराम नाईक, जागर फाउंडेशन अध्यक्ष प्रा बी जी मांगले, कोल्हापूर रोटरी क्लब अध्यक्ष संदीप शहापूरकर, मराठा बॅंक बेळगाव चे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, नासिर बोरसदवाला व हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप्ड कोल्हापूर च्या सचिव रेखा देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

के एल इ सोसायटी बेळगाव, आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव, जागर फाउंडेशन तसेच हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप्ड कोल्हापूर यांच्या सहकार्याने संपन्न होणाऱ्या शिबिरात अर्थोपेडिक तज्ञ, (हाडांचे आजार) त्वचारोग तज्ञ, एम डी मेडिसीन औषध तज्ञ, डोळ्यांची आजार तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नाक, कान, घसा तज्ञ, बालरोग तज्ञ, इसीजी तज्ज्ञ, रक्त तपासणी प्रयोगशाळा व यावरील सर्व मोफत औषधोपचार याव्यतिरिक्त गंभीर आजार आढळल्यास व पुढील उपचारांची गरज असल्यास केएलई सोसायटीकडून ‘यलो कार्ड’ दिले जाणार आहे. या सर्वांचा लाभ चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगाव सीमा भागातील रुग्णांनी घ्यावा. असे आवाहन सुबराव पवार, पुंडलिक पवार रोटरी क्लब चे पदाधिकारी संदीप शहापूरकर, सुहास शेलार व नितीन लोहार आदींनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks