“मशिदीवरील भोंग्याचा विषय आता कायमचा संपवायचा,” राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
मनसेच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना आदेश माझं पत्र तुम्ही राहात्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरू केलेला मशिदीवरील भोंग्यांचा विषय शांत होताना दिसत होता, पण आता राज ठाकरेंनी पुन्हा या विषयाला हवा दिली आहे. राज ठाकरेंनी आज एक पत्र ट्विट करत मनसेच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. आपल्या पत्रात ‘मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचाय, कामाला लागा’, असे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचंय असंही त्यांनी सांगितलं होतं. ते पत्र जारी करत मशिदीवरील भोंग्याच्या विषयाला पुन्हा हवा देण्याचे काम राज यांनी केले आहे. राज्यात भोंग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाऊन राज ठाकरेंचे पत्र देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.