केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ ?

केंद्र सरकारच्या एक कोटींपेक्षा जास्त कर्मचा-यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचा महागाई भत्ता आणि डीआरमध्ये ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.
सध्या डीए अर्थात महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर असून तो वाढून ४६ टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्याची महागाईची स्थिती पाहिल्यास १२० दिवसांनंतर डीए ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यापाठोपाठ उर्वरित भत्तेही २५ टक्क्यांनी वाढतील. ग्राहक किंमत निर्देशांक जुलैमध्ये ३.३ अंकांनी वाढून १३९.७ अंकांवर पोहोचला होता.
केंद्रीय कर्मचा-यांना सध्या ४२ टक्के महागाई भत्ता मिळतो. ऑल इंडिया कन्झूमर प्राईज इंडेक्स आणि कंझ्युमर फूड प्राईज इंडेक्सने जारी केलेल्या डेटानुसार महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो. अर्थात कर्मचा-यांचा डीए आणि डीआर ४६ टक्के होऊ शकतो. यासंबंधीचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाला घ्यायचा आहे.
डीए आणि डीआरमध्ये होणारी वाढ ही प्रत्येक वर्षाच्या जानेवारी आणि जुलैमध्ये होत असते. सध्याच्या डेटावरून केंद्रीय कर्मचा-यांच्या दोन्ही भत्त्यांमध्ये ४ टक्क्यांची वाढ होऊ शकते. महागाई भत्ता ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर उर्वरित भत्ते २५ टक्क्यांनी वाढतील.