वैद्यकीय व आरोग्य विषयक शैक्षणिक महाविद्यालये सुरु करावेत : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधिन राहून जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व आरोग्य विषयक महाविद्यालये सुरु करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.
१) वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या प्रवेश द्वारावर उपस्थित प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनिवार्यतेने थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक वर्गखोली हवेशीर व 50 टक्के पेक्षा कमी आसन क्षमतेने वापरावी.
२) वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये उपस्थित प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल अथवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक राहील.
३) वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कुटूंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ते शारीरिक अंतर राखण्याबाबतचा नियम काटेकोरपणे पाळावा.
४) ताप, सर्दी, खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना संस्थेमध्ये प्रवेश देण्यात येवू नये.
५) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2020/प्र.क्र.140/एसडी-6, दिनांक 10/11/2020 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.
६) एकमेकांच्या वस्तू उदा. पेन, मोबाईल व इतर शैक्षणिक साहित्य एकमेकांनी हाताळू नयेत.
७) वैद्यकीय शिक्षण संस्थांचे प्रवेशद्वार, बैठक कक्ष, बाथरुम, प्रसाधनगृह येथे हात धुण्याकरिता पुरेशा प्रमाणात साबण व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन द्यावे. तसेच प्रशिक्षणाचे ठिकाण दररोज निर्जंतुकीकरण करावे.
८) वैद्यकीय शिक्षण संस्थेमधील सर्व खोल्यांचे 1 टक्का सोडीयम हायपोक्लोराईड वापरुन दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच प्रत्येक तासिकेनंतर वर्ग खोली व आसन व्यवस्था निर्जंतुक करावी.
९) सर्व 18 वर्षांवरील पात्र प्रशिक्षणार्थ्यांचे जिल्हा लसीकरण अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाशी संपर्क करुन आठ दिवसाच्या आत प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावे.
१०) वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील सर्व अधिकारी, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांचे प्रथम प्राधान्याने लसीकरण करुन घेणे तसेच कोविड-19 चाचणी करणे बंधनकारक आहे.
११) या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.