‘ बिद्री ‘ चा सर्वाधिक अंतिम ऊसदर प्रतिटनास ३११६ रुपये देण्याची अध्यक्ष के. पी. पाटील यांची घोषणा ; वाहतूकदारांना डिझेल दरफरकासह वाहतूक दरवाढ

बिद्री प्रतिनिधी :
बिद्री साखर कारखान्याचा चालू गळित हंगामाचा सरासरी उतारा १२.९९ असून कारखान्याने गळितास आलेल्या ऊसाला प्रतीटन ३०५६ रुपये सभासदांना अदा केले आहेत. यामध्ये आणखी ६० रुपयांची वाढ करुन ३११६ रुपये अंतिम दर देणार तसेच ऊस वाहतूकदारांना डिझेल दरवाढीसह वाहतूक दरवाढ देण्याची घोषणा अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली.
कारखाना कार्यस्थळावर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेची सांगता व सेवकांना १२ टक्के वेतनवाढ लागू केलेबद्दल कामगार युनियनमार्फत आयोजित केलेल्या संचालकांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, चालू सन २०२१-२२ च्या गळीत हंगामात कारखान्यास ६ लाख ३९ हजार मे. टन ऊसाचे गाळप झाले असून त्यापासून ८ लाख ३१ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा १२.९९ इतका मिळाला आहे. चालू हंगामासाठी एफआरपी रुपये ३०५६ प्रमाणे एकूण रक्कम १९५ कोटी ४८ लाख रुपये ऊस उत्पादकांना अदा केली आहे. राज्य शासनाच्या दि. २१ फेब्रुवारी रोजीच्या अधिसुचनेने ज्या – त्या हंगामाचा साखर उतारा त्या – त्या हंगामासाठी एफ. आर. पी. निश्चित करणेसाठी गृहित धरण्याचे धोरण निश्चित केले आहे. आपल्या कारखान्याने उच्चांकी साखर उतारा मिळविला असल्याने बिद्रीच्या ऊस पुरवठादारांना वाढीव प्रतिटन ६० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. लवकरच त्याचा भरणा सबंधीतांच्या खात्यावर करत आहोत.
त्याचबरोबर ऊस वाहतूकीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना हंगामात झालेल्या डिझेल दरवाढीचा फरक १ कोटी ३९ लाख रुपये तसेच वाहतूक दरात मायलेजनुसार दरवाढ १ कोटी ९ लाख रुपये देणेचा निर्णय घेतला आहे. ऊस वाहतूकदारांची हंगाम अखेरची सर्व बिले टोळी भाड्यासह अदा केली असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार नोव्हेंबर २०२१ पासून सेवकांना पगाराच्या १२ टक्के वेतनवाढ लागू केली असून मागील ३१ महिण्यांचा फरक ४ कोटी ८० लाख रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. सदरची रक्कम त्यांना मासिक पगारातून विभागून देणेत येणार आहे. बिद्रीचा कामगार व माझं एक अतूट, अभेद्य विश्वासाचं नातं असून राजकीय गटा –तटांच्या पलिकडे जाऊन मी आजवर ज्यांनी या बिद्रीच्या प्रगतीत मोलाच वाटा उचलला त्या कामगारांच्या श्रमाचा सन्मान करीत आलो आहे.
कामगार संचालक भिमराव किल्लेदार यांनी सेवकांना १२ टक्के वेतनवाढ दिल्याबद्दल सेवकांच्यावतिने संचालकांचे अभिनंदन करुन कामगारांचे प्रश्न मांडले. स्वागत अजित आबिटकर यांनी केले. प्रास्ताविक भिमराव किल्लेदार यांनी केले. या कार्यक्रमाला कारखान्याचे व्हा. चेअरमन विठ्ठलराव खोराटे, गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, प्रविणसिंह पाटील, प्रविणसिंह भोसले,धनाजी देसाई, राजेंद्र पाटील, श्रीपती पाटील, उमेश भोईटे, मधुकर देसाई, धोंडीराम मगदूम, के. ना. पाटील, जगदिश पाटील, एकनाथ पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके तसेच माजी व्हा. चेअरमन सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील – कुरुकलीकर, कामगार संचालक शिवाजी केसरकर, कामगार नेते आर. वाय. पाटील, युनियन अध्यक्ष संजय मोरबाळे व्यवस्थापकीय’ संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह सर्व अधिकारी व कामगार उपस्थित होते. आभार अशोक फराकटे यांनी मानले.