महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन १९ ऑगस्टला ; उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, उदय सामंत, इंद्रनील नाईक, पोपटराव पवार यांची उपस्थिती

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट २०२५) सकाळी ९ ते ५ या वेळेत गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट पुणे येथे आयोजित केले आहे. राज्यभरातील स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. युवराज येडूरे म्हणाले, “या अधिवेशनात महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी एकत्रितपणे सहभागी होऊन महाराष्ट्रातील सामाजिक समस्या, विकास आणि समाजासाठी काम करण्याच्या शासनाच्या व कंपनीच्या सीएसआर निधीतून विविध उपक्रम राबवण्यासाठी चर्चा व ठराव करणार आहेत. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.”
“धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, विभागीय प्राप्तिकर अधिकारी नितीन वाघमोडे, टेंडर गुरुचे संचालक हर्षद बर्गे, महा सीएसआर डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोरे, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्र व गोवा राज्य समन्वयक डॉ. अंजली बापट, नाशिक विभागीय समन्वयक डॉ. विकास देव अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. मंत्रालय समन्वय समिती सदस्य प्रा. डॉ. बापुसाहेब अडसुळ, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, महाराष्ट्र पर्यावरण समन्वय समितीचे सल्लागार संजय भोसले, उद्योजक विक्रम उगले आदी उपस्थित राहणार आहेत,” असेही डॉ. येडूरे यांनी नमूद केले.
डॉ. युवराज येडूरे म्हणाले, “अनेक वर्षापासून प्रलंबित सामाजिक समस्यांवर चर्चा आणि उपाययोजना, स्वयंसेवी संस्थांच्या कामाचे व्याप्ती व त्यांचे महत्त्व आणि समाजावर होणारे परिणाम, अधुनिक जीवनशैली विकास कामांमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका, नवीन तंत्रज्ञान आणि संधी, तसेच सामाजिक क्षेत्राचे हक्काचे महामंडळ होण्यासाठी ठराव प्रेरित केले जाणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्नांवर व शासन स्तरावर विविध ठराव मांडण्यात येणार आहेत. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या शासकीय योजना, सीएसआर निधी, अर्थिक व कायदेशीर प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांनी या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”