ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलला प्रशासकीय मान्यता ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार भूमिपूजन ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचा भूमिपूजन शुभारंभ होणार आहे. दरम्यान; छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल म्हणजेच सीपीआरमध्ये अत्यावश्यक सोयी -सुविधा, अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनसाठी ४४ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ३० एकर जागा राखीव ठेवलेली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. लवकरच एकूण अकराशे बेडच्या सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक अशा या महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी ६०० बेड आहेत, २५० बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे. शासन स्तरावरील ४५१ कोटींच्या तिन्ही स्वतंत्र प्रशासकीय मान्यता नुकत्याच मिळाल्या आहेत. तसेच; हॉस्पिटलमधील सात मोड्युलर ऑपरेशन थिएटर, सीएसएसडी, इमारतींची आणि अंतर्गत रस्त्यांची देखभाल -दुरुस्ती यांच्या निधीसाठीही ७३ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. इमारतींची बांधकामे पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा- सुविधा आणि परिसर सुधारणांसह या कामांवर एक हजार कोटींहून अधिक रुपये खर्च होणार आहेत.

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह, मुलींचे वस्तीगृह या पाच इमारती ५८ कोटी निधीच्या खर्चातून पूर्णत्वाला आलेल्या आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

असे होणार हॉस्पिटल……

□एकूण ३० एकरांत अकराशे बेडचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल /आरोग्य संकुल
□न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत
□निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरूष वस्तीगृह- क्षमता २५०
□निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वस्तीगृह- क्षमता २५०
□मुलींचे वस्तीगृह- क्षमता १५०
□मुलांचे वस्तीगृह- क्षमता १५०
□परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता ३००
□ सेंट्रल लायब्ररी
□ परीक्षा भवन- क्षमता ४००
□अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण

सर्वोच्च समाधान……!
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय. माझ्या जिल्ह्यातील अत्याधुनिक आरोग्यसंकुल ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब. या आरोग्य संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा तर मिळतीलच. परंतु; मुंबईसारख्या मोठ्या शहरात होणारे कॅन्सरचे उपचारही कोल्हापुरातच मिळतील. तसेच; पुण्या- मुंबईला जाऊन करावे लागणारे हृदय, यकृत प्रत्यारोपण, मेंदूच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यासारखे विशेषोपचारही रुग्णांना कोल्हापुरातच मिळतील.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks