गारगोटी येथे एम. के. बी. हॉस्पिटल चे ३० नोव्हेंबर रोजी होणार उद्घाटन; देवराज बारदेस्कर यांची पत्रकार परिषदेत माहिती; सवलतीच्या दरात होणार गरजू व गरीब रुग्णांवर उपचार.

गारगोटी प्रतिनिधी :
श्री मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटी, गारगोटी यांच्या वतीने प्रेरणास्थान ख्रि. बाबीशेठ उर्फ मनवेल जी बारदेसकर यांच्या जयंती निम्मित गारगोटी येथे एम के बी हॉस्पिटल व मनोराज जनआरोग्य सहाय्य योजनेचे उद्घाटन बारदेस्कर शिक्षण संकुल, साई मंदिर जवळ गारगोटी येथे दिनांक ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ११:०० होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक देवराज बारदेसकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली.
या उपक्रमातून लाभार्थी सभासदाला वैद्यकीय तपासण्या, बाह्य रुग्ण तपासणी, शस्त्रक्रिया व उपचार आणि औषधे ह्या सुविधा वार्षिक २५,००० रुपये पर्यंत अटी व शर्तीस अधीन राहून मोफत मिळणार आहेत. तरी भुदरगड तालुक्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यकारी संचालक श्री देवराज बारदेसकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून केले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देवराज बारदेस्कर यांनी एम के बी हॉस्पिटल व मनोराज जनआरोग्य सहाय्य योजनेविषयी माहिती दिली. आज आपला समाज कोवीड सारख्या जागतिक महामारीतून सावरत आहे, कोवीड काळामध्ये संस्थेमार्फत एम के बी कोवीड केअर सेंटर चालू करून १५० पेक्षा जास्त कोरोना ग्रस्त गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम केले. तसेच गरीब रुग्णांना बावीस लाखापर्यंत उपचारात सुट देऊन मदत केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सामान्य कुटुंबात एखाद्या आजाराने गरीबी वाढण्याचे प्रमाण वाढले आहे म्हणून आम्ही सी. एस. आर. आणि एफ. सी. आर. ए. कायद्याअंतर्गत दात्यांकडून निधी उभा करून गरिब व सामान्य नागरिकांच्या मोफत तसेच स्वस्त उपचारासाठी दोन योजना घेऊन आलो आहोत.
१. मनोराज जन आरोग्य सहाय्य योजना.
२. MKB हॉस्पिटल.
ते पुढे म्हणाले की, संस्थेमार्फत आरोग्य विषयक वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, त्यामध्ये संस्थेचे आर. ए. एन. एम. हे नर्सिंग महाविद्यालय २००९ पासून सुरु आहे. संस्थेमार्फत महिलांसाठी अनेमिया मुक्त अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबीरे आयोजित केली जातात. तसेच संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचा लिंक वर्कर योजना हा प्रकल्प सुरु आहे.
सदर पत्रकार परिषदेस नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविता बारदेस्कर, अनिल भोई व एम. के. बी. हॉस्पिटलचा कर्मचारी उपस्थित होते.