कोल्हापुर मनपा निवडणुक शक्य नसल्याने प्रशासक डॉ. बलकवडे यांना मिळाली मुदतवाढ..

रोहन भिऊंगडे /
कोल्हापुर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी प्रशासन म्हणुन मुदतवाढ देण्यात आली आहे.नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या सभेपर्यंत त्यांचे प्रशासक पद कायम राहणार असल्याचे आदेश राज्य शासनाकडून काढण्यात आले आहे.राज्य निवडणूक आयोगाने संबंधित पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आणखी कालावधी लागणार असल्याचे कळवले आहे. परंतु आता प्रशासक डॉ. बलकवडे यांना मुदतवाढ मिळाल्याने निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली होती. मुदत संपल्यानंतर कोरोनाची पहिली लाट आल्यामुळे महापालिकेची निवडणूक मुदतीत घेता आली नाही. त्यामुळे राज्य शासनाने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची सहा महिन्यांसाठी प्रशासक पदी नियुक्ती केली होती. त्यांची मुदत ३० एप्रिल पर्यंत होती. दरम्यान प्रशासनाने आरक्षण प्रभाग रचना, प्रारूप मतदार यादीचे काम पूर्ण केले आहे. तर मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू असतांना कोरोनाची दुसरी लाट आली. यामध्ये कोल्हापूर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना प्रशासक पदी मुदतवाढ दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणूक कधी होणार याची शाश्वती नसल्याने नवे सभागृह अस्तित्वात येईपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.