लोंढा नाला धरणग्रस्त विविध मागण्यांसाठी आक्रमक; बेमुदत पाणी बंद आंदोलन सुरु; गेट रूमला ठोकले टाळे, पाणी विसर्ग पुर्णताः बंद.

राधानगरी प्रतिनिधी : प्रतिश पाटील
तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथे २०१६ साली ५६०३.२२५ सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता असलेला हा मध्यम प्रकल्प येथील बैलगोंड ओढ्यावर अस्तित्वात आला असून या प्रकल्पामुळे केळोशी, जाधववाडी , सुतारवाडी, वळवंटवाडी , कुंभारवाडी , कुरणेवाडी , देऊळवाडीसह छोट्या -मोठ्या वाड्या -वस्त्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. लाभक्षेत्रातील ४७० हेक्टर शेतीला हा प्रकल्प लाभदायी ठरला आहे. येथिल ४५ भुमीपुत्रांची जवळपास ३३ हेक्टर शेतजमिन वीस वर्षांपुर्वी प्रकल्पासाठी संपादीत झाली. तेंव्हापासुन आजतागायत या धरणग्रस्तांना पुनर्वसन नियमानुसार पर्यायी शेतजमिनी मिळालेल्या नाहीत. येथिल प्रकल्पग्रस्त शेतकरी विविध समस्येंच्या गर्तेत सापडले आहेत.
संकलन रजिस्टर यादी पूर्ण करावी, संपादित जमीनीचे भु भाडे मिळावे, सुलभतेने पाणी परवाना मिळावा, लाभक्षेत्रात असलेल्या शेतीयोग्य मुलकीपड जमिनी मिळाव्यात अशा धरणग्रस्तांच्या मागण्या आहेत. सदर मागण्यांचे निवेदन धरणग्रस्तांनी ४ मे रोजी जिल्हाधिकारी व संबंधीत खात्याला दिले होते. मागण्या मान्य न झाल्यास १८ मे पासुन धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करु असा इशाराही दिला होता. तथापी कोणतीही कार्यवाही झालेली नाही म्हणुन संतप्त धरणग्रस्तांनी आज मुख्य गेटला टाळे ठोकुन पाण्याचा विसर्गच बंद केला. ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात ४७० हेक्टर शेतजमीनीचे व पिकांचे नुकसान पाहता लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी धरणग्रस्तातून होत आहे. बुधवार दिनांक १८ पासून बेमुदत पाणी बंद आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिक गणपती पाटील, संभाजी पाटील,मारुती चौगुले, कृष्णात पाटील, शंकर चौगुले, श्रीपती पाटील, विष्णू पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत पाटील ,ज्योतीराम चौगुले ,राजू चौगुले, अजित पाटील, सागर पाटील, मोहन पाटील , मारुती पाटील, सदा पाटील,एकनाथ पाटील ,मारुती कदम ,कोंढीबा पाटील ,उत्तम चौगुले ,प्रदीप पाटील, नितीन पाटील, मीनानाथ पाटील, तानाजी कांबळे, सुभाष कांबळे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली २० वर्षे अनेक आंदोलने व निवेदने देवुनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडून ठोस असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.
संभाजी पाटील, धरणग्रस्त, केळोशी बु. ता.राधानगरी