विधानपरिषद बिनविरोध म्हणजे ‘वाटणीपत्र’ : ‘आप’ची टीका

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राज्यातील विधानपरिषदेच्या सहा जागांवर निवडणुका लागल्या होत्या. यासाठी भाजप, शिवसेना व काँग्रेस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु आज राज्यातील सत्तारुढ आघाडी व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वाटाघाटीत सर्व जागा बिनविरोध करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर विधानपरिषदेची जागा काँग्रेसला सोडल्याने सतेज पाटील बिनविरोध निवडून आले. निवडणुकीच्या दरम्यान महाडिक-पाटील गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले, पत्रकार परिषदा घेतल्या, कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. परंतु नेत्यांनी वाटणीपत्र करून आम्ही केलेले आरोप-प्रत्यारोप हे फक्त निवडणुकीपुरते होते, आमची आता ‘सेटलमेंट’ झाली आहे अशी भूमिका घेतली.
या विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनी आपला आमदार निवडून द्यायचा होता. परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये बिनविरोध येणाऱ्या उमेदवारांकडून आणि त्यांच्या पक्षांकडून कोणत्याच किमान कार्यक्रमावर काम करण्याचे आश्वासन मतदारांना दिले गेले नाही. निवडणुकीच्या मूळ हेतुलाच हरताळ फासून मतदारांची तसेच जनतेची फसवणूक केली गेली. या सेटलमेंटचा आम आदमी पार्टी निषेध करते. अशाप्रकारचे वाटणीपत्र करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या पक्षांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार त्यांची जागा दाखवतील अशी टीका ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली.