ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

विधान परिषद निवडणूक समझोता एक्स्प्रेस सुसाट : सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, अमल महाडिक यांनी घेतली माघार

कोल्हापूर

भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझोता एक्स्प्रेस धावली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. त्यानुसार कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना भाजपच्या कमांडकडून करण्यात आली आहे. परिणामी काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून महाडिक यांना विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना आल्यानंतर महाडिक कुटुंबीय आणि समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत महाडिक यांनी पक्षाचा आदेश मानत माघार घेण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक या पारंपारीक कट्टर विरोधकांत इर्षेची लढाई सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले होते. जिल्ह्यावर राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडीक यांच्यात गेल्या काही वर्षापासून हाडवैर निर्माण झाले आहे. राजकीय वर्चस्वासाठी पाटील व महाडिक यांच्यात प्रचंड टोकाचे राजकारण सुरू आहे. २०१५ मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणूकीत दारूण पराभव केला होता. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांचा सतेज पाटील यांनी पराभव करून बदला घेतला होता. पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांना पराभवाची धूळ चारली होती. आता पुन्हा सतेज पाटील व अमल महाडीक विधान परिषद निवडणुकीत आमने-सामने आले होते. दोघांत तुल्यबळ लढतीमुळे गेल्या काही दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती. आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झडत होत्या. काटाजोड लढतीमुळे एकेक मतासाठी साम, दाम, दंड, भेद आदींचा वापर केला जात होता. परंतू निवडणूक बिनविरोधचा निर्णय झाल्याने कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला. बिनविरोधची समझोता एक्स्प्रेस यशस्वी झाल्याने सतेज पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे  निवडणुकीतील हवा निघून गेली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks