क्रांतिदिनी विनाअनुदानित शिक्षक करणार घंटानाद आंदोलन : प्रदेशाध्यक्ष संजय डावरे

कोल्हापूर प्रतिनिधी : तुकाराम पाटील
राज्यातील सर्व अंशतः अनुदानित,अघोषित, त्रुटी अपात्र शाळांना 100% प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षक 9 ऑगस्ट क्रांतिदिनी राज्यभरात शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ढोलबजाव आणि घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती मुंबई अध्यक्ष श्री. संजय डावरे यांनी दिली आहे.
याबत अधिक माहिती देताना कोकण विभागाचे अध्यक्ष यादव शेळके म्हणाले आम्हां विनाअनुदानित शिक्षकांवर गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे.सर्वच विनाअनुदानित शाळा आज १००% प्रचलित नियमानुसार अनुदानास पात्र असताना काहींना 20% तर काहींना 40% अनुदान देऊन शासनाने आमची बोळवण केली आहे.तर बऱ्याच शाळांना अजून एक रुपया देखील अनुदान नाही. जवळपास वीस वर्षे विनाअनुदानित शाळेत सेवा करून काही शिक्षक बिनपगारी निवृत्त झाले आहेत तर काही येत्या एक-दोन वर्षात होतील.
भारतीय संविधानात सर्वांना समानतेची संधी असताना,’समान काम-समान दाम’ या तत्वानुसार अनुदानित शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शिक्षकांना वेतन मिळणे हा आमचा केवळ हक्कच नसून तो आमचा अधिकार आहे. मात्र शासन हेतुपुरस्सर आमच्या बाबतीत झोपेचे सोंग घेत असल्याने शासनाला झोपेतून जागे करण्यासाठीच संघटनेचे वतीने ढोलबजाव व घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे असे संजय डावरे यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महविकास आघाडीच्या उमेदवारांना शिक्षकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते.तसेच गृहराज्यमंत्री श्री.सतेज बंटी पाटील यांनी आमचा प्रश्न सोडविण्याचे पालकत्व स्वीकारले होते.त्यामुळेच संघटनेचे उमेदवार श्री.खंडेराव जगदाळे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार घेतली होती आणि काँग्रेसचे उमेदवार श्री.जयंत आसगावकर यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.जर 15 ऑगस्ट 2021 पूर्वी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शिक्षक आमदार यांच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेचे वतीने देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी / शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असून यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांनी उपस्थित रहावे असे आवाहन धनाजी साळुंखे, अनिल पाटील, गुलाब पाल, सुरेखा इंगवले, उषा सिंग यांनी केले आहे.