राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्ड काढावे : सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा)चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला असून, राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक असल्यामुळे सर्वांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे.
आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार इत्यादी माहिती समजण्यास जलद आणि सोयीस्कर मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
ABHA Health Card साठी आवश्यक कागदपत्रे
– आधारकार्ड
– आधार लिंक मोबाईल क्रमांक
हेल्थ कार्डचे फायदे काय असतील ?
– इलाज करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही.
– आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल.
– ऑनलाईन उपचार, टेलीमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील.
– तुमचा मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल.