कोल्हापूर पत्रकार परिषद : मी पॅकेज जाहीर करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत शासकीय विश्रामगृह येथे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हा प्रशासकडून पूरबाधित गावांमध्ये एनडीआरएफ पथक, प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने पुरग्रस्तांचे स्थलांतर आदी उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार पुरग्रस्थांना नुकसानभरपाई लवकर देण्यासाठी कोल्हापूरमध्ये ड्रोनद्वारे सर्वे करून पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी खालील मुद्दे मांडले.
अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर जिल्हा प्रशासनाने लाखो नागरिकांचे स्थलांतर करून जीव वाचवलेतसेच पशुधनही वाचवण्यात आले आहे.
महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे. या संकटातून बाहेर पडताना कोविड तसेच पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणे, नागरिकांना दिलासा देणे, त्यांचे पुनर्वसन करण्याकडे आमचे प्राधान्य आहे.
हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी आहे. याचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमचा मानस आहे.
अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा आराखडा करून काम सुरू केलं जाणार आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून त्याबाबतीत काही उपाययोजना केल्या जाणार आहेत.
पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आहेत.