Kolhapur : केडीसीसी बँकेची पिककर्ज वसुलीची परंपरा कायम ; उत्पादनात घट होऊनसुद्धा ९० टक्क्यांवर वसुली

कोल्हापूर प्रतिनिधी :विजय मोरबाळे
केडीसीसी बँकेने पिककर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. उत्पादनात घट होऊनसुद्धा ३० जून २०२३ अखेर पीककर्ज वसुली ९० टक्क्यांवर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील एकूण १९०६ विकास संस्थांच्या माध्यमातून दोन लाख, ५३ हजार शेतकऱ्यांना गेल्यावर्षी म्हणजेच सन २०२२-२३ या पीक हंगामामध्ये २०४३ कोटींचे पीककर्ज वाटप केले होते. जून २०२३ अखेर २३४३ कोटी वसूलपात्र पीककर्ज रकमेपोटी एकूण २२७० कोटी पीककर्ज वसूल आला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत २८६ कोटीने पीककर्जाचे वाटप जादा असूनही यावर्षी वसुलीचे प्रमाण ९० टक्के झाले आहे. गतवर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे सरासरी १५ ते २० टक्क्याने ऊसपिकामध्ये घट झाली होती. असे असूनदेखील शेतकरी, विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव, साखर कारखाने, सर्व बाजार समित्या यांनी बँकेला वसुलीसाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच; बँकेच्या संचालक मंडळांनेही मे व जूनमध्ये आपापल्या तालुक्यातील सेवा संस्थांच्या आढावा सभा घेऊन वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यामुळे या पिक हंगामातसुद्धा बँकेची चांगल्या वसुलीची परंपरा कायम राहिली.
बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी शेतकरी, विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव, साखर कारखाने, सर्व बाजार समित्या, बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, सर्व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.