कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा परिषद आवारात आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी :
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनने जिल्हा परिषद आवारात भरदुपारी आंदोलन केले. महिला एवढ्या संतप्त होत्या, की त्यांनी पोलिसांच्या गराड्यातूनच जिल्हा परिषदेच्या गेटवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. मदतनीस, सेविकांचे मानधन पाच तारखेला करण्यासह खासगी अंगणवाड्या का बंद कराव्यात, अशी मागणी केली. मागणीचे निवेदन महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना देण्यात आले. संघटनेचे नेते आप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कंदले, शोभा भंडारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
विविध मागण्यांसाठी आज दुपारी युनियनने जिल्हा परिषदेवर धडक दिली. तत्पूर्वी महावीर गार्डन येथून या मोर्चास सुरुवात झाली. या वेळी मागण्यांबाबत शासन गंभीर नसल्याने निषेधाच्या घोषणाही दिल्या. दुपारी दीडच्या सुमारास हा मोर्चा जिल्हा परिषदेवर दाखल झाला. गतवेळी महिलांनी थेट प्रवेशद्वारावर बंद केल्याने अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना जिल्हा परिषदेत जाण्यास मोठाच अडथळा झाला. त्यामुळे या मोर्चावेळी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. गेट बंद करून पोलिस तैनात केले होते. त्यामुळे आंदोलकांना आत प्रवेश करता आला नाही. त्यामुळे सेविका, मदतनीस यांनी गेटवर उभे राहूनच जोरदार घोषणा दिल्या.
संघटनेने शासनाकडे केलेल्या मागण्या अशा, जिल्ह्यात अनेक गावात प्राथमिक शाळेत बालवाडीच्या नावाखाली अंगणवाडीचे वर्ग भरवले जात आहेत. त्यामुळे अंगणवाडीची पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे अशा खासगी बालवाड्या बंद कराव्यात, अशी महत्त्वाची मागणी केली. अंगणवाडी मदतनीस, सेविकांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला जमा करावे. रिक्त जागा ताबडतोब भराव्यात. ज्या अंगणवाडी सेविका निवृत्त किंवा मृत झाल्या आहेत त्या ठिकाणच्या मदतनीसांना तात्काळ पदोन्नती द्यावी. मदतनीसांना मे महिना आणि दिवाळीच्या शिल्लक सुट्ट्या त्यांच्या सोयीनुसार घेणेबाबत परवानगी मिळावी आदी मागण्या केल्या.