कोल्हापूर : सीपीआरचा डायलेसिस विभाग पाच दिवसांपासून बंद ; प्रशासनाचे दुर्लक्ष ; नागरीकांची गैरसोय

कोल्हापूर प्रतिनिधी :
किडनी विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना सीपीआरमधील डायलेसिस विभाग ‘देवदूत’ ठरला असतानाच गेल्या पाच दिवसांपासून विभागातील उपकरणे बंद आहेत. त्यामुळे या विभागाला कुलूप आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून उपचारासाठी येणारे रुग्ण डायलेसिस विभागाचा दरवाजा ठोठावून उपचाराअभावी माघारी परतू लागले आहेत. डायलेसिस विभागातील एकाच वेळी ही उपकरणे बंद पडली कशी, हा संशोधनाचा विषय आहे.सीपीआर प्रशासनाने या विभागाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयांना लाजवेल असा येथील डायलेसिस विभाग आहे. रोटरी क्बल ऑफ हेरिटेज, रोटरी मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर, बैतुलमाल कमिटीसह अन्य दानशूर व्यक्ती, संघटनांनी विभागाला सुसज्ज करण्याबरोबर अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेकडो रुग्णांच्या उपचाराची सोय झाली आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे या विभागाचा लौकिक वाढला आहे.