ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : अतिक्रमणामुळे सीपीआरचा जीव गुदमरतोय ; अतिक्रमण हटवा यासाठी विविध संघटनांकडून मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा दवाखाना म्हणून ओळख असणाऱ्या सीपीआरला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. झेरॉक्‍स सेंटर, उपहारगृह, झुणका भाकर केंद्र, चहा टपरी, नास्ता सेंटरसह इतर अतिक्रमणामुळे सीपीआरचा जीव गुदमरतोय अशी परिस्थिती आहे. ही अतिक्रमणे काढावीत, यासाठी वारंवार जिल्हा प्रशासन व सीपीआर प्रशासनाकडे मागणी होत आहे.

सीपीआरमधील रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनशेजारीच काही टपरीवर चहा उकळत असतो, हे गंभीर आणि धोकादायक आहे. मात्र, कारवाईविना केवळ चालढकल केली जात आहे.

सीपीआरमध्ये कोल्हापूरसह कोकण आणि कर्नाटकमधून रुग्ण उपचारासाठी येतात. कोरोना संसर्गादरम्यान अनेक गरीब रुग्णांना सीपीआरचा मोठा आधार मिळाला. ज्यावेळी रुग्णांची संख्या वाढते, त्यावेळी सीपीआर परिसरात रुग्णवाहिका असो किंवा आपत्तीवेळी अग्निशमन दलाला आपली यंत्रणा गतिमान करण्यास अडथळा निर्माण होत असतो.

दोन वर्षांपासून कोरोनामुळे सीपीआरमधील रुग्ण वाढले आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लागते. यासाठी ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्पही उभारला आहे. ऑक्‍सिजन प्रकल्पाद्वारे सुमारे ४५० हून अधिक बेडना ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जात आहे.

ज्या ठिकाणी ऑक्‍सिजनची पाईप जाते, तिथेच टपरीवर खाद्यपदार्थ आणि चहा शिजवला जातो. या धोक्याची जाणीव असूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. तीन ते चार वर्षांपासून या अतिक्रमणाबद्दल अनेक स्तरातून चर्चा होते.

हे अतिक्रमण काढावे यासाठी विविध संघटनांकडून मागणीही होत आहे. या सर्व मागण्या बेदखल केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन व सीपीआर प्रशासनाकडून यावर वारंवार चर्चा होते. अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त मात्र ठरत नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks