नवनीत राणांना ठार मारण्याची धमकी दिली म्हणत, संजय राऊतांविरोधात ‘ऍट्रॉसिटी’ ची तक्रार

मुंबई प्रतिनिधी :
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडेच केली आहे.
राऊत यांनी खासदार नवनीत रवी राणा यांना जातीवाचक शिवीगाळ आणि जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुंबईत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा निर्धार व्यक्त करत थेट शिवसेनेलाच आव्हान दिले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी हा विषय जोरदार तापला होता. तेव्हा नागपूर दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी राणा दाम्पत्याची बंटी आणि बबली अशी संभावना करत त्यांना इशारा दिला होता. कृपा करुन शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका, मातोश्रीशी छेडछाड करु नका, 20 फूट खाली गाडले जाल, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका, अशा आशयाचे विधान केले होते.
यापुढे जर कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं, तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावं, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.