कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात आढळला १२ फुटी अजगर

गारगोटी प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्यातील कोळवण येथील सरपंच साताप्पा गुरव यांच्या भोकर नावाच्या शेतात, भातकापणी दरम्यान पूर्ण वाढ झालेला, महाकाय असा १२ फूट लांब व ८० किलो वजनाचा अजगर साप आढळला.
भुदरगड तालुक्यातील कोळवण हे गाव डोंगरी भागात वसलेले असून सद्या भात पिकाची कापणी, झोडणी, मळणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान कोळवण गावचे सरपंच साताप्पा गुरव यांच्या भोकर नावाच्या शेतात भातकापणी दरम्यान अजस्त्र असा अजगर साप आढळला, क्षणार्धात परिसरात शेतीची कामे करणाऱ्या महिला पुरुषामध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी जावून सर्पमित्र अवधुत पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणात आणताना, सागर गुरव यांच्या मदतीने व दिपक गुरव, संदिप गुरव, दिनकर गुरव, भिमराव गुरव, आकाश पाटील, महिला वर्ग यांच्या सहकार्याने अजगर सापास पकडले.
भुदरगड वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मारुती डवरी, वनरक्षक शिवाजीराव लटके, बजरंग शिंदे यांच्याकडे अजगर सापास सुपूर्द करताना, त्यास दाट जंगलभागात मुक्त करण्यात आले.
“अजगर साप, निसर्गाने निर्मिलेला सुंदर जीव. स्वतःहून दुसऱ्यास कधीही त्रास न देणारा, शांत, संयमी, लाजाळू.. उपद्रवी माणसापासून चार हात लांब राहणारा.. आकाराने अजस्त्र, अवाढव्य असा.. पायथॉनिडी (pythonidae) कुळातील अजगरास इंग्रजीमध्ये Indian Rock Python असे म्हणतात. कोकणात आर (R), घाटमाथ्यावर अजगर तर Python Molurus ह्या शास्त्रीय नावाने ओळख. तसं पाहता, अजगर हा अजस्त्र साप, जाडजूड..दिसता क्षणी नजर खिळवून ठेवणारा हा साप आपल्या रंगकांतीची छाप नकळत पाडून जातो. काहीशी राखाडी, पिवळसर, तपकिरी अंगकांती.. छोट्या पिलांच्या अंगावर मात्र काहीशी पुसट, अस्पष्ट जाणवणारी.. पोटाखालील भाग सफेद, काहीसा दुधाळी.. शरीरावर मोठाले चौकोनी वाटणारे चट्टे (डाग) असतात. जणू ही अंगकांती नक्षीकाम केलेला जाळीदार कशीदाच वाटतो.. अजगराच्या डोक्याचा भाग काहीसा दबल्यासारखा चपटा, लांबट.. डोके व शरीराच्या तुलनेत मान बारीक.. त्यामुळे बलदंड शरीराच्या मानाने डोक्याचे वेगळेपण चटकन जाणवते. नाकपुड्या मोठ्या.. डोळे डोक्याच्या मानाने खूपच लहान.. बुबुळे सोनेरी, काहीशी तपकिरी वाटणारी.. डोळ्यांची बाहुली उभी म्हणजे हा निशाचर. (भक्ष्य शोधार्थ रात्री बाहेर पडणाऱ्या सापांच्या डोळ्यांची बाहुली उभी असते, त्यामुळे हे रात्रीचा संचार करणारे.. निशाचर)
पूर्ण वाढ झालेला अजगर साप अंदाजे ७० ते ८० किलो भरेल इतक्या जाडजूड शरीर यष्टीचा असतो, आपल्या कोकण व पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास हा साप १२ ते १३ फुटापर्यंत तर काही ठिकाणी १८ फुटापर्यंत आढळल्याच्या नोंदी पहायला मिळतात. लांबीचा विचार केल्यास शरीराचा मधला भाग खुपच जाडसर असतो. तोंड व शेपटीकडे हि जाडी कमी कमी होत जाते. लांबीच्या मानाने शरीराचा हा अवाढव्य स्थूलपणा इतर सापांमध्ये कमी प्रमाणात पहायला मिळतो. त्यामुळेच त्याचे वेगळेपण चटकन नजरेत भरते, दाट जंगल, दऱ्याखोऱ्यातील खडकाळ भाग, पाण्याचा जलस्रोत, किर्रर्र जंगलाने वेढलेले ओढे -नाले, धबधबे अश्या ठिकाणी ह्या सापाचे वास्तव्य हमखास असते,
अजगर हा मंदगतीचा साप पण झाडावर सहजरित्या चढू शकतो. झाडाच्या मोठाल्या ढोलीमध्ये निवांत राहू शकतो. पाण्यात पोहण्याबरोबरच, पाण्याच्या आसपास त्याचा आढळ असतो. ह्या सापाच्या खाद्यात जंगली कोंबड्या, हरीण, भेकर शिवाय विविध छोटे -मोठे पक्षीही प्रामुख्याने येतात, ज्यास विळखा घालून अर्धमेल करायचं मग गिळायला सुरुवात करायची.. बऱ्याच वेळा तो झाडावर लोंबकळत राहतो, असं प्रत्यक्षदर्शी पाहणारे लोक सांगतात. अजगर नर मादीच्या यशस्वी मिलनानंतर अजगर मादी अंडी उबवेपर्यंत अंड्याच्या आसपास राहते.
अजगर हा सुस्त पण महाकाय, अजस्त्र भासणारा. काळजात धडकी भरवणारा साप.. वाटेस गेल्यास नक्कीच गिळणार ही भावना प्रत्येकाच्या मनात घर करून असते, पण अजगर सापाने लहान मुलास, माणसांना गिळल्याच्या नोंदी आढळत नाहीत.
सापांबद्दल बरेच समज -गैरसमज आहेत. ह्या गैरसमजातून सृष्टीतील हा अनमोल जीव हकनाक मारला जातोय, अन्नसाखळीत अत्यंत महत्वाचे स्थान असणारा हा जीव वाचला तरच हि अन्नसाखळी अबाधित राहणार, अन्यथा हा निसर्गाचा समतोल ढासळायला वेळ लागणार नाही,.”
अशी अजगराबद्दलची सविस्तर माहिती सर्पमित्र अवधुत पाटील यांनी दिली.