गोकुळच्या सभा घेण्यास परवानगी पण दुकानांना निर्बंध; हा तर आपली सोय बघण्यातला प्रकार: ‘आप’ची टीका

कोल्हापुर :-रोहन भिऊंगडे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करत रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी घोषित केली. यामध्ये बाजारपेठांमधील दुकानांना व्यवसाय करण्यासाठी निर्बंध लागू केले नव्हते. परंतु काल स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयात बाजारपेठांमधील दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय व्यापारी, फेरीवाले व किरकोळ विक्रेत्यांना मारक ठरणार आहे. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ची अंमलबजावणी तसेच शारीरिक अंतराचे नियम पाळून सर्व व्यापारी व्यवसाय करण्यास तयार आहेत. अशाप्रकारच्या तुघलकी निर्णयाने सर्वसामान्यांचे आर्थिक चक्र पुन्हा बिघडणार आहे.
दुकानांमधील कामगारांची संख्या कमी करून, ‘नो मास्क नो एन्ट्री’ची प्रभावी अंमलबजावणी करून तसेच शारीरिक अंतराचे नियम पाळून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक प्रशासनाने मज्जाव करू नये. स्थानिक व्यापाऱ्यांना नियमावली घालून देऊन व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अन्यथा आम आदमी पार्टी व्यापाऱ्यांना सोबत घेऊन सत्याग्रह करेल. एकीकडे गोकुळच्या निवडणुकीसाठी सभांना परवानगी, तर दुसरीकडे सामान्य व्यापाऱ्यांना निर्बंध आणणे म्हणजे आपली सोय बघण्यातला प्रकार असल्याची टीका ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली.