जयवंतराव वारके : दातृत्वाचा वारसा चालविणारे व्यक्तिमत्त्व

आनंद वारके
(मजरे कासारवाडा)
विनम्र स्वभाव
जयवंतरावांचे जाणे तसे अचानक.जयवंतराव गावातील ती एक भली असामी होती.आपण भलं आणि आपलं काम भलं अशी त्यांची वृती होती.शेती व्यवसायाशी प्रामाणिक होते ते.कोणाच्या एकात नाही की दोन्हीत नाही.असा त्यांचा विनम्र स्वभाव.
एक कलंदर
तारुण्यात विविध तर्हेची माैज करणारा एक कलंदर होते जयवंतराव.त्यावेळी टू व्हीलर म्हणजे गावात एक वेगळे अप्रुप.राजदूत एक त्यावेळचा ब्रँड.राजदूतवरुन सवारी म्हणजे भन्नाट अशी कल्पना.जयवंतरावांची पण एक राजदूत होती.तिला नटविणे सजविणे.यात त्यांचा भरपूर वेळ जायचा.उगीचच कोल्हापूरला एकादा फेरफटका मारणे अशी हाैस.त्यात माजी सरपंच अशोकराव वारकेंची साथ.दोघे जानी दोस्त.मग काय मोठी माैज.दोघांनाही त्या काळात टू व्हिलरवरुन घुमण्याची मोठी हाैस होती.वडील वसू अण्णांचीही मुलग्याच्या हाैसेला साथ होती.
एक कलावंत
एक कलावंत होते जयवंतराव.
त्या काळात त्यांनी एक नाटकही बसवून सादर केले होते.आठवत नाही.पण “गोष्ट धमाल नाम्याची” हे नाव असावे त्या नाटकाचे.नंतर हे नाटक आम्ही मंडळीनी बसावायचे ठरविले होते.अख्खं नाटक तोंडपाठ होतं त्यांना.अख्खा नाटकाची स्क्रीप्ट न चुकता लिहून दिली होती त्यांनी आम्हाला.
आगळी वेगळी वरात
होळी सणाला गावात आेबड धोबड सोंगं काढली जायची.यातून एक आगळी वेगळी वरात काढली होती गावातून.त्यावेळच्या हाैसी तरुणांनी मिळून.बैलगाडी जपून.संपूर्ण गावातून.प्रत्येक दारात थांबली वरात की तुकडा पाणी पण दिले जायचे.आणि प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्यं “जोडा शोभून दिसतोय” अर्थात या जोड्यात जयवंतरावांनी नव्या नवरीची स्त्री भूमिका केलेली होती.आणि वरदेव होते कै.रंगराव महादेव तोैंदकर.ही आगळी वेगळी वरात त्यावेळी गावात खूप गाजली होती.
वेगळे रसायन
ते श्री.काळम्मादेवी विकास सेवा संस्थेचे बरीच वर्षे सदस्य होते.त्यांनी एकदा ग्रामपंचायत निवडणुकही लढविली होती.निवडणुकीत अपयश आले होते.पण ते नाराज नव्हते.निवडणुकीतील अपयश त्यांनी कधीच व्यक्त केले नाही.त्यांचा एका बाजूला स्वभाव असा शांत होता.पण दुसर्या बाजूला त्यांना वावगेही खपायचे नाही.जयवंतराव असे वेगळे रसायन होते.
शिकारीचा छंद
शिकार हा छंद त्यांनी बरीच वर्षे जोपासला होता.गावशिवारातील डुकरांची ते शिकार करीत.काही वेळेला बिद्री किंवा राधानगरीच्या जंगलातही शिकारीला जात असत.माजी सरपंच अशोकराव वारके व रघुनाथ लक्ष्मण वारके ही दोन मित्र मंडळी सोबत झाली की त्यांनी कुणीही सोबत लागत नव्हते.
दातृत्वाचा वारसा
श्री.पाणेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी जयवंतरावांचे चुलत आजोबा भाऊसो रामचंद्र वारके व वडील वसू अण्णा यांनी जमीन दान दिली.जयवंतरावांनी या मंदिरात फरशी बसवून आपल्या वडिलांचा व चुलत्यांचा वारसा चालविलेला होता.श्री.पाणेश्वर मंदिरात अलिकडे होणारा गणपती उत्सव साजरा करण्यातही त्यांचा पुढाकार होता.जयवंतरावांनी दातृत्वाचा वारसा असा पुढे सुरु ठेवला होता.
भावपूर्ण श्रद्धांजली
जयवंतराव एक भल्या मनाचे व्यक्तिमत्त्व कासारवाडा गावाने आज गमावले.भावपूर्ण श्रद्धांजली.