आजरा तालुक्यातील केडीसीसी ठरावधारकांनी वादळात दिवा लावला : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली प्रशंसा; केडीसीसी बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल सुधीर देसाई यांचा वेळवट्टी येथे सत्कार
आजरा तालुक्यातील सगळेच नेते सुधीरच्या विजयासाठी एकवटले, ही स्वर्गीय राजारामबापू देसाई यांची पुण्याई म्हणावी लागेल.

वेळवट्टी :
केडीसीसी बँकेच्या आजरा तालुक्यातील सभासदांनी ठरावधारकांनी अक्षरश: वादळात दिवा लावला आहे. त्यांच्यामुळेच सुधीर देसाईसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला केडीसीसीचा संचालक म्हणून निवडून जाण्याची संधी मिळाली, अशी प्रशंसा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
वेळवट्टी ता. आजरा येथे सुधीर देसाई यांच्यासह ठरावधारकांच्या सत्कार समारंभात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आजरा – चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश पाटील होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, सुधीर देसाईच्या विजयासाठी ठरावधारक तीन महिने बाहेर पडले. काटालढत असतानाही त्यांनी नोकऱ्या, पैसा, आश्वासने अशी सगळी आमिषे धुडकावली. आजरा तालुक्यातील सगळेच नेते सुधीरच्या विजयासाठी एकवटले, ही स्वर्गीय राजारामबापू देसाई यांची पुण्याई म्हणावी लागेल.
आमदार राजेश पाटील म्हणाले, गेल्या सहा वर्षात मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांनी बँकेचा कारभार शेतकऱ्यांच्या कल्याणाचा केलेला आहे. येणारी पाच वर्षेही मंत्री मुश्रीफसाहेब अध्यक्षस्थानी हवेत, ही संपूर्ण जिल्ह्याची भावना आहे. मुश्रीफसाहेब, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि केडीसीसी बँक त्यांच्या दारापर्यंत नेण्यासाठी अध्यक्षस्थानी तुम्हीच असणे गरजेचे आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.
प्रास्ताविकपर भाषणात सत्काराला उत्तर देताना केडीसीसी बँकेचे नूतन संचालक सुधीर देसाई म्हणाले, वडील स्वर्गीय राजारामबापू देसाई यांच्या बॅंकेच्या निवडणुकीतील पराभवाचे शल्य आम्हा सर्वच कार्यकर्ते व नेतेमंडळींना होते. माझ्या विजयाने ते नाहीसे झाले. ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी आंबेओहळ प्रकल्प पूर्णत्वाला नेला आहे. त्याचप्रमाणे उचंगी आणि सर्फनाला हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून पाणी आडवावे, ही तालुक्यातील शेतकऱ्यांची भावना आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकास तर करूच. तसेच केडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवू.
“बघूया, त्या मिठ्या किती काळ टिकतात……”
जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी हे सुधीर देसाई यांच्या विरोधात गेले. याचा संदर्भ देत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष करतानाच ठरले होते की आजरा तालुक्यात आमच्या उमेदवारांपैकी ज्याच्याकडे जास्त मते त्याच्या पाठीशी श्री. शिंपी यांनी राहायचे. परंतु, आधीच जाऊन त्यांनी दुसऱ्यांना मिठ्या मारल्या. नंतर माझा फोनही त्यांनी घेतला नाही. बघूया, त्या मिठ्या अजून किती काळ टिकतात, असा गर्भित इशाराही मंत्री मुश्रीफ यांनी दिला.
“अध्यक्षपदाचा निर्णय सर्वानुमते……”
आमदार राजेश पाटील यांच्या भाषणाचा धागा पकडत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँकेची अध्यक्ष निवड येत्या शुक्रवारी दि. 20 रोजी आहे. त्यादिवशी सकाळी बैठक घेऊन 18 संचालक मिळून अध्यक्षपदाबाबत एकमताने निर्णय घेऊ.
“चंद्रकांतदादांच्या ज्ञानात भर……”
आजऱ्यात अशोक चराटी यांचा पराभव झाल्यामुळे भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आम्ही विश्वासघात केल्याचे सांगताहेत. या मुद्द्यावरून श्री. पाटील यांचा खरपूस समाचार मंत्री मुश्रीफ यांनी घेतला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी सांगतो, आघाडी किंवा पॅनेल हे एकाच तालुक्यापुरते होत नसतं. ज्याच्याकडे ठराव धारक आहेत, तोच शड्डू ठोकून उभा ठाकत असतो. त्याप्रमाणे सुधीर देसाई यांनी तो शड्डू ठोकला आणि कुस्ती चित्रपट मारलीही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी विश्वासघात केला वगैरे, असे आरोप करणे हे गैर आहे.
याप्रसंगी वसंतराव धुरे, उदयराज पवार, मुकुंद देसाई, नूतन संचालक भैया माने, सौ. स्मिता गवळी, एम. के. देसाई, विष्णुपंत केसरकर, सर्व ठराव धारक, ग्रामस्थ, विविध संस्थेचे चेअरमन तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
स्वागत जनार्दन बामणे यांनी केले. सूत्रसंचालन गिलबिले सर यांनी केले. आभार प्रकाश पवार यांनी मानले.