KDCC Bank Elections Result : नागरी बँक-पतसंस्था गटात अर्जुन आबिटकर यांचा एकतर्फी विजय; सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा!

कोल्हापूर:
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या नागरी बँक-पतसंस्था गटात विरोधी गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू व उमेदवार अर्जुन आबिटकर यांनी एकतर्फी विजय मिळवत या गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे यांना धक्का दिला. या गटात श्री. आवाडे यांचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे. या गटातील विद्यमान संचालक अनिल पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
आबिटकर यांना ६१४ तर श्री. आवाडे यांना ४६१ मते मिळाली. अनिल पाटील यांना १०६ मते पडली. या गटातील १२२१ मतदारांपैकी १२०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या गटातून सत्तारूढ आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी आबिटकर यांचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना डावलून सत्तारूढ गटाने आवाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या श्री. आबिटकर यांनी प्रा. मंडलिक यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळवली व एकतर्फी विजय मिळवून मुश्रीफ यांच्यासह सत्तारूढ गटाच्या नेत्यांना एकच धक्का दिला.