केडीसीसी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार प्रदान ; मुंबईत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचा शानदार कार्यक्रम

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०२३ -२४ सालासाठीचा “कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक” पुरस्कार प्रदान झाला. मुंबईमध्ये दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या एका शानदार कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून केडीसीसी बँकेचा हा गौरव झाला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड -मुंबई यांच्यावतीने दरवर्षी सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी बँकांना पुरस्कार वितरण केले जाते. पुरस्कार वितरणाचे हे २६ वे वर्ष आहे. सन २०२२-२३ या आर्थिक सालासाठीही बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक हा विशेष पुरस्कार मिळाला होता.
“दृष्टीक्षेपात आर्थिक मापदंड……”
केडीसीसी बँकेच्या दि. ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षातील बँकेचे आर्थिक मापदंड असे………!
□ ढोबळ नफा: रू. २४५ कोटी
□ वसूल भाग भांडवल: ३०७ कोटी
□ ठेवी: १०, ६३५ कोटी
□ कर्जे: ७, ४२३ कोटी
□ खेळते भांडवल: १३, ३४६ कोटी
□ सी.आर.ए.आर.: १५. २५ टक्के
□ नेट एनपीए: शून्य टक्के
□ ढोबळ एनपीए: ४.१८ टक्के
□ सर्वच म्हणजे १९१ शाखा नफ्यात
संगणकीकरणात अग्रेसर…….!
सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, आधुनिकतेचा भाग म्हणून केंद्रीय सहकार मंत्रालयाने विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणाला प्राधान्य दिले आहे. यामुळे पारदर्शकता, विश्वासार्हता आणि वेळेची बचत होऊन सहकार चळवळ गतिमान होईल. महाराष्ट्रात आतापर्यंत चार हजारावर विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण झाले आहे. त्यापैकी; केडीसीसी बँकेच्या नेतृत्वाखाली संगणकीकरण झालेल्या १,७५१ विकास सेवा संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकेच्यावतीने लाडक्या बहिणींसाठी स्वयंरोजगार व उद्योग- व्यवसायाच्या उभारणीसाठी ताराराणी अर्थसाहाय्य योजना ही अल्प व्याजदराची कर्ज योजनाही सुरू केली आहे. तसेच; बँकेने सभासद शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषी- औद्योगिक क्रांतीमध्येही बँकेचे मोठे योगदान आहे. बँकेने तंत्रज्ञानातही मोठी गरुडभरारी घेतलेली आहे.
यावेळी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ कड, उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे आदी प्रमुख उपस्थित होते.