मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा तपास थांबवा ; ठाणे कोर्टाचे एटीएसला आदेश

मुंबई ऑनलाईन :
ठाण्यातील व्यावसायिक हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवा, असे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत. तपास थांबवून हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवण्यात यावीत, असेही कोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे. ‘हिरन मनसुख यांच्या हत्येचा तपासही केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली आहे. तरीही एटीएसने तपास सुरू ठेवला आहे आणि आरोपींची कोठडीही मिळवत आहे. तपास तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा’, अशा विनंतीचा अर्ज एनआयएतर्फे करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने हा आदेश दिला. कोण होते मनसुख हिरन? काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पियो कार सापडली होती. ही कार मनसुख हिरन या व्यावसायिकाची असल्याचं समोर आलं होतं. ही कार तिथं कशी आली, याचा तपास सुरू असतानाच हिरन यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत सापडला होता. त्यामुळं प्रचंड खळबळ उडाली होती. ही आत्महत्या असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं होतं. मात्र, त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता शवविच्छेदन अहवालानंतर पुढं आली. राष्ट्रीय तपास संस्था () अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचे धागे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. निलंबित सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मुंबईतही एनआयएचा विशेष कोर्टात अर्ज एनआयएने मुंबईतील एनआयएच्या विशेष कोर्टातही अर्ज दाखल केला आहे. अँटीलिया स्फोटके प्रकरणात सचिन वाझे यांच्याविरोधात नवे आरोप ठेवण्यात येत आहेत, असे सांगून उद्या एनआयए कोठडी वाढवून घेण्याच्या प्रयत्नात एनआयए आहे. आज तातडीने एक अर्ज दाखल केला आहे. त्यातील तपशील तात्काळ उपलब्ध होऊ शकलेला नाही. मात्र, उद्या संपत असलेली कोठडी या अर्जाच्या आधारे वाढवण्याची विनंती कोर्टाला करण्यात येणार असल्याचे समजते.