कागलचे ‘ चला करु प्रगत वर्ग अभियान ‘ पुणे विभागात द्वितीय ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बिद्री प्रतिनिधी /अक्षय घोडके :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे अंतर्गत संशोधन विभागाच्यावतीने राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली होती. सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी आज या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. यामध्ये कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी तालुक्यात राबविलेल्या ‘ चला करु प्रगत वर्ग ‘ अभियान या नावीन्यपूर्ण उपक्रमाला पुणे विभागात द्वितीय क्रमांक मिळाला. या उपक्रमाची आता राज्य स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रत्येक मूल ही राष्ट्राची संपत्ती असून शिक्षणात मुलाला केंद्रबिंदू मानण्यात आले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयानुसार प्रत्येक मूल शिकले पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे. हे महत्व लक्षात घेऊन कागल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शंभर टक्के मुले शिकली पाहिजेत ; यासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी मागील शैक्षणिक वर्षात ‘ चला करु प्रगत वर्ग ‘ हे अभियान तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत राबविले.
या अंतर्गत तालुक्यातील दहा केंद्रातील प्रत्येक इयत्तेचे पहिले तीन प्रगत वर्ग निवडण्यात आले. प्रथम तीन आलेल्या वर्ग शिक्षकांचा तालुकास्तरावर प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यांमुळे शिक्षकांत निकोप स्पर्धा वाढीस लागली शिवाय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही वाढ झाली. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल जिल्हा व राज्य पातळीवरही घेण्यात आली. या यशाबद्दल डॉ. कमळकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे
.