कागल : ‘शाहू’ च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत उच्चांकी ४५८ मल्लांचा सहभाग ; सोमवारी रंगणार (ता.११) विजेते पदासाठीच्या अंतिम फेरीतील लढतींचा थरार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी येथे रविवारी (ता.१०)महिला व पुरुष(वरिष्ठ) गटातील रोमहर्षक लढती झाल्या.
महिला गटात पंचावन्न तर पुरुष गटात त्रेसष्ट अशा एकुण एकशेहे अठरा मल्लांची नोंदणी झाली.या आधीच्या मल्लांसह उच्चांकी ४५८ मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी या स्पर्धा सुरू केल्या. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून या स्पर्धा सलग ३९व्या वर्षी संपन्न होत आहेत. संचालक युवराज पाटील व माजी उपनगराध्यक्ष मारुती मदारे यांच्या हस्ते कुस्ती लावून आजच्या तिसऱ्या दिवशीच्या लढतींचा प्रारंभ झाला.
रविवारी सुट्टीमुळे स्पर्धेच्या ठिकाणी कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सीनियर गटासह महिला विभागातील चटकदार लढतींमुळे कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्यांच्याकडून दाद देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येत होते ऑलम्पिकच्या धर्तीवरील अचूक व नेटक्या नियोजनामुळे पारदर्शकपणे या स्पर्धा पार पडत आहेत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले अनुभवी व नामवंत मल्ल पंच म्हणून काम पाहत आहेत. स्पर्धास्थळी येऊ न शकणाऱ्या शौकिनांसाठी महाखेल- कुस्ती हेच जीवन या फेसबुक व यूट्यूब चैनल वरून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.
सोमवारी (ता.११)रंगणारविजेते पदासाठीचा अंतिम फेरीतील लढतींचा थरार…
मॕटवरील या कुस्ती स्पर्धेकडे मल्लांसह शौकिनांचे लक्ष लागून राहिलेले असते. या स्पर्धेतील विजेते मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. त्यामुळे कुस्ती क्षेत्रातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेतील विजेत्यांकडे कुस्ती क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले असते. सर्व गटातील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या दोन विजेत्यांसाठीच्या लढती पूर्ण झालेल्या आहेत. तर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकासाठीच्या अंतिम लढती सोमवारी(ता.११) सकाळी कारखाना साईटवरील गोडाऊन नंबर चारमध्ये होणार आहेत.याचवेळी बक्षीस वितरण शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.