कोल्हापूरातील गूळ हंगामाच्या महिन्यातच गुळ सौदे बंद ; शेतकर्यांचे नुकसान

कोल्हापूर प्रतिनिधी :
गेल्या महिनाभरात विविध प्रश्नांवर पाच वेळा गुळाचे सौदे बंद पडले. याचा कोल्हापुरी गूळ बाजारपेठेवर मोठा परिणाम होत आहे. गतवर्षी हमाली दरवाढीवरून वाद उफाळला होता. गुळाचे सौदे बंद राहिल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले होते.
दोन वर्षांपूर्वी व्यापारी व हमाल यांच्यातील भांडणामुळे उत्पादकांनी बाजार समितीला टाळे ठोकले होते. त्यापूर्वी अडत दुकानदार व हमाल यांच्यात वाद होता. आता बॉक्सच्या वजनाचा वाद निर्माण झाला आहे. शेतकर्यांनी बॉक्समधून गूळाचे रवे आणावेत, अशी मागणी व्यापार्यांनी केली. त्यानुसार शेतकर्यांनी तयारी दर्शवली. पण आता बॉक्सच्या वजनावरून वाद सुरू झाला आहे.
गेल्या महिनाभरात पाच वेळा गुळाचे सौदे बंद पडले. संतप्त गूळ उत्पादकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयावर वाहनांसह मोर्चा काढला. पालकमंत्री पाटील यांनी व्यापार्यांना वजनाचा मुद्दा निकालात काढावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.