दुय्यम निबंधक कार्यालयातील महिला लिपीक लाच स्वीकारताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सर्च रिपोर्ट व नकला देण्यासाठी e-challan व्यतिरिक्त पैशांची मागणी करुन जास्तीचे पैसे लाच म्हणून स्विकारताना निलंगा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. अश्विनी दत्तात्रय जाधव (वय 47 रा. आदर्श कॉलनी, लातूर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिला लिपीकाचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई निलंगा दुय्यम निबंधक कार्यालयात मंगळवारी (दि.25) केली. अश्विनी जाधव यांना 4,500 रुपये लाच घेतान रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत 29 वर्षीय व्यक्तीने लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.24) तक्रार केली होती. तक्रारदार यांनी दुय्यम निबंधक कार्यालय निलंगा येथे सर्च रिपोर्ट , सूची क्र.2, मूल्यांकन व नकला मिळण्यासाठी वेगवेगळे अर्ज केले होते. अर्जातील माहिती व नकला पुरविण्यासाठी अश्विनी जाधव यांना e-challan व्यतिरिक्त पैसे मागण्याचा व स्विकारण्याचा अधिकार नसताना त्यांनी फिस च्या नावाखाली 3,225 रुपये व वर काय द्यायचे ते द्या..! असे म्हणून लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी याबाबत लातूर एसीबी कार्यालयात तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, अश्विनी जाधव यांनी e-challan व्यतिरिक्त पैसे मागण्याचा व स्विकारण्याचा अधिकार नसताना तक्रारदार यांच्याकडे अतिरिक्त 1275 रुपये लाच मागणी केली. तक्रारदार यांच्याकडून e-challan चे 3225 रुपये आणि अतिरिक्त 1275 असे एकूण 4500 रुपये स्वीकारताना जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड व त्यांच्या पथकाने केली.