कागल येथे ” यशश्री ” इंग्लिश मीडियम स्कूल चे उदघाटन; राजे फौंउडेशन चा शैक्षणिक उपक्रम

कागल प्रतिनिधी :
कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांनी कागल संस्थांनमध्ये बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले होते. त्यांचा हाच वारसा यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन सक्षम पणे पुढे चालवून यशस्वी होईल. असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.
येथे कागल संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या जयंतीनिमित्त राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन संचलित यशश्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या उदघाटनाचे वेळी त्या बोलत होत्या.
शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व सौ.नवोदिता घाटगे या उभयतांच्या हस्ते या इंग्लिश मीडियम स्कूलचे ऑनलाईन समारंभाद्वारे उदघाटन झाले.
यावेळी कर्नल दिलीप मंडलिक, शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत जयसिंगराव घाटगे,स्व. राजे विक्रमसिंह घाटगे व सरस्वती प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते केले.
सौ.घाटगे पुढे म्हणाल्या,आजच्या ग्लोबल स्पर्धेच्या युगात मातृभाषेबरोबर जागतिक भाषा इंग्रजीचे चांगले ज्ञान विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे.पालकांचा ओढाही इंग्रजी शाळांकडे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय व्हावी. यासाठी या शाळेची स्थापना केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सुसंवादातून आदर्श विद्यार्थी घडवू. असेही त्या म्हणाल्या.
स्वागत प्रशासन अधिकारी एस. व्ही. वेसविकर यांनी केले.
आभार श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलचे मुख्याध्यापक एस डी खोत यांनी मानले.
टप्प्याटप्प्याने शाळेचा विस्तार करणार
शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय ग्रामीण भागात झाली पाहिजे. या ध्येयाने शाहू साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व राजे विक्रमसिंह घाटगे यांनी श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलाची स्थापना केली होती, त्यांचा हाच विचार पुढे नेण्यासाठी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना केली आहे. चालू शैक्षणिक वर्षात नर्सरी, जूनियर व सीनियर केजी असे पहिल्या वर्षी तीन वर्ग सुरू होत आहेत. ते टप्प्याटप्प्याने पाचवी पर्यंत विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे.असेही त्यांनी स्पष्ट केले.