सरसेनापती संताजी घोरपडे यांनी कधीच मोगलांची गय केली नाही ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन सेनापती कापशी येथे भेट देऊन स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा.

सेनापती कापशी :
सरसेनापती संताजी घोरपडे हिंदवी स्वराज्याचे महान मराठा योध्दे होते. त्यांनी मोगलांची कधीच गय केली नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हिंदवी स्वराज्याशी इमान राखले, असेही ते म्हणाले.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सेनापती कापशी ता. कागल येथे भेट देऊन सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी सुप्रसिद्ध वास्तुविशारद सौ. अमरजा निंबाळकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
येथील तलावात या स्मारकाचे काम सुरू आहे. यापूर्वी स्मारकासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता. दरम्यान भाजप सरकारच्या काळात निधीअभावी या स्मारकाचे काम रखडले. आता पुन्हा नव्याने सात कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या महिनाअखेरीस निविदा निघून पुढच्या महिन्यापासून काम सुरू होईल. वर्षभरातच या स्मारकाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होईल.
प्रास्ताविकपर भाषणात माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आमदारकीच्या काळात सहा वर्षांपूर्वी या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीमध्ये निधीअभावी या स्मारकाचे काम रखडले. या काळात भाजपचेअनेक अनेक नेते सेनापती कापशी येथे आले आणि गेले. परंतु; या स्मारकाच्या निधीसाठी कोणीही आस्था दाखविली नाही. शेवटी हा प्रश्न ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोडविला.
हे माझे भाग्य……..
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पंधरवड्यापूर्वी सरसेनापती संताजी घोरपडे यांचे चरित्र लिहीत असलेल्या जेष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांना भेटलो. त्यांचे पराक्रम, जिद्द, धाडस आणि हिंदवी स्वराज्याप्रती इमान ऐकून भारावून गेलो. अशा या महान मराठा योद्ध्यांचे स्मारक पूर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. हे स्मारक एक ऐतिहासिक ठेवा म्हणून पिढ्यानपिढ्या जनतेला प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.
यावेळी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कागलचे उप अभियंता डी. व्ही. शिंदे आदी उपस्थित होते.