उत्तूर विभागाला विकास कामांमध्ये अग्रस्थानी ठेवू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; भादवण मध्ये साडेचार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण

उत्तुर प्रतिनिधी :
उत्तुर विभागाने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. या विभागाला विकास कामांमध्ये नेहमीच अग्रेसर ठेवू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. कागल, गडहिंग्लज तालुक्यांच्या बरोबरीनेच या विभागालाही न्याय देऊ, असेही ते म्हणाले.
भादवण आजरा येथे साडेचार कोटी रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मूलभूत ग्रामीण विकासाची गंगा संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी नेत आहे. येत्या वर्षात एकही काम शिल्लक राहणार नाही. ते पुढे म्हणाले, गेल्या २५ वर्षात जिथे सत्ता मिळाली, त्या सर्वच ठिकाणी सामान्य, दलित, कष्टकरी, गरीब माणूस नजरेआड होऊ दिला नाही. गरीब व सामान्य माणसांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. सार्वजनिक कामापेक्षा तो व्यक्तिगत कामाला महत्त्व देत असतो. म्हणूनच गोरगरिबांच्या वैयक्तिक कल्याणाच्याही योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या. गोरगरिबांसाठी असलेली पेन्शन अडीचशे रुपयांवरून पाचशे, सहाशे व हजार रुपयांपर्यंत पोचवली. यापुढे ती दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या योजनांसाठी असलेली २१ हजारांची उत्पन्न मर्यादा ५० हजारांपर्यंत करणार आहे.
कार्यक्रमाआधी नळ पाणीपुरवठा योजना -९१ लाख, भादवण ते भादवणवाडी रस्ता- दोन कोटी, अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण-१५ लाख, भादवण मुख्य रस्ता व गटारी- ५० लाख, अंतर्गत रस्ते आरसीसी, पेविंग ब्लॉक व डांबरीकरण -२० लाख, ग्रामविकास योजना २५:१५ – ४५ लाख, गट ब ३०:५४ योजना मुख्य रस्ता ५० लाख अशा चार कोटी रुपये निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली म्हणाले, ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी उत्तूर विभागातील गावांना विकास निधी भरभरून दिला आहे. या मतदारसंघात झालेली सर्वच विकास कामे ही त्यांच्याच माध्यमातून झालेली आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली व विष्णुपंत केसरकर यांचीही भाषणे झाली.
व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, विष्णुपंत केसरकर, मारुतराव घोरपडे, दीपक देसाई, सुनील देसाई, दशरथ आजगेकर, विजय वांगणेकर आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच, बी. टी. जाधव, संजय गाडे, विजय माने, बाळासाहेब डोंगरे, तुकाराम सुतार, विष्णू मुळीक, गोपाळ केसरकर, आनंदराव जोशिलकर, तुळशीराम मुळीक, महादेवराव डोंगरे, तुकाराम पाटील, राजेश जोशिलकर, जयसिंग पाटील, जानू पाटील, शामराव मुळीक, रामचंद्र गोरे, ईश्वर गाडे, शंकर कांबळे, अर्जुना दोरुगडे, उत्तम माने, विजय खुळे, सदाशिव पाटील आदीही उपस्थित होते.
स्वागत बी. टी. जाधव यांनी केले. प्रास्ताविक विष्णु मुळीक यांनी केले आभार विजय माने यांनी मानले